
भाजप बैठक
83249
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना मकरंद देशपाडे. शेजारी धनंजय महाडिक, अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे आदी.
कोल्हापूर, हातकणंगलेच्या विजयाचा संकल्प करू
---
मकरंद देशपांडे; अमित शहांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी बैठक
कोल्हापूर, ता. १६ : वर्षभरानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवार (ता. १९)च्या दौऱ्यात कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा संकल्प करूया, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी केले.
शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी बालाजी गार्डन येथे आयोजित कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे अध्यक्षस्थानी होते. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, सांगलीचे पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
भाजपने महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघ हे निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभा प्रवास योजनेत समाविष्ट केलेले आहेत. या अनुषंगाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हातकणंगले आणि कोल्हापूरची जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा यात समावेश आहे. रविवारी शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून या दोन लोकसभा मतदारसंघांच्या विजयाची नांदी दिली जाईल, असे देशपांडे म्हणाले.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, हिंदुराव शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, गायत्री राऊत, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अशोकराव माने, अनिलराव यादव, राहुल देसाई आदी उपस्थित होते. संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरचिटणीस विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.