आजरा ः सर्फनाला प्रकल्पाबाबत बैठक

आजरा ः सर्फनाला प्रकल्पाबाबत बैठक

पुनर्वसनाशिवाय सर्फनालाची घळभरणी नाही
प्रकल्पग्रस्तांचा निर्धार; आजऱ्यात ‘श्रमुद’ची बैठक
आजरा, ता. १९ : शंभर टक्के पुनर्वसन झाल्याखेरीज घळभरणीचे काम होऊ देणार नाही. सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम राहण्याचा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी निर्धार केला. येथील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील चित्री, उचंगी, आंबेओहळ, एरंडोळ, धनगरमोळा या प्रकल्पातील धरणग्रस्त उपस्थित होते. त्यांनी सर्फनाला धरणग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. ‘श्रमुद’चे राज्य कार्याध्यक्ष संपत देसाई बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
देसाई म्हणाले, ‘आजरा-आंबेओहळ धरणातील शंभरहून अधिक धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरणात पाणी तुंबविले गेले आहे. अजून त्या धरणातील धरणाग्रस्तांचे पुनर्वसन शिल्लक आहे. उचंगी धरणातही पुनर्वसन पूर्ण न करता पोलिस बंदोबस्तात घळ भरणीचे काम केले. हा सगळा अनुभव लक्षात घेऊन सर्फनाला प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन झाल्याखेरीज घळ भरणीचे काम करू देणार नाही. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलिस बंदोबस्तात धरणाची घळ भरणी करण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील सर्व धरणग्रस्त रस्त्यावर उतरतील.’ यावेळी दशरथ घुरे, विष्णू मांजरेकर, नारायण भडांगे, सचिन पावले, शिवाजी येजरे, अशोक बांदेकर, शांताराम लाड, बाळू दोरुगडे, भीमराव माधव, प्रकाश शेटगे, अमरसिंग ढोकरे, बाळू जाधव यांच्यासह चित्री, उचंगी, आंबेओहळ, येरंडोल, धनगरमोळा धरणातील धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.
----------------
चौकट
प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील
दरम्यान, सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्राधान्याने मार्गी लावल्या जातील. पुनर्वसनाच्या कामाला गती देणार असून, प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील सुविधा, खेडगे गावाला महसुली गावाचा दर्जा यासह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी प्रशासन सकारात्मक आहे, असे दोन दिवसांपूर्वी पारपोली (ता. आजरा) येथे प्रकल्पग्रस्तांबरोबर झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, तहसीलदार विकास अहिर, मंडल अधिकारी गीता कुंभार, उपअभियंता शरद पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com