
अमित शहा- बंदोबस्त आणि पाहणी
83547
...
अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त अधिकाऱ्यांची पाहणी
ड्रोन चित्रीकरणावर बंदी, वाहतूक मार्गात बदल ः आज रंगीत तालीम शक्य, परजिल्ह्यातील पोलिस दाखल
कोल्हापूर, ता. १७ ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दौऱ्यादरम्यान ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, तेथील पाहणी आज दिल्लीतील विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी केली. दसरा चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराज पुतळा, न्यू एज्युकेशन सोसायटीचा पेटाळ्यावरील कार्यक्रम, विमानतळ अशा ठिकाणी आज ही पाहणी केली.
दरम्यान, परजिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. रविवारी शिवजयंती असल्यामुळे शहरातील प्रमुख एकेरी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुले केले आहेत. तसेच जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी ड्रोनद्वारे चित्रीकरणास बंदी घातली आहे.
दिल्लीतील खास पथकाकडून बंदोबस्ताचे नियोजन सुरू झाले आहे. मंत्री शहा यांच्या दौऱ्यानिमित्त दसरा चौकात खास शिडीची व्यवस्था केली आहे. त्याची पाहणी त्यावर जाऊन करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्लीच्या पथकाला सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाणही उपस्थित होते. उद्या प्रत्यक्षात बंदोबस्त आणि वाहनांसह रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत नियोजन करीत आहेत.
सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून पोलिस अधिकारी-कर्मचारी आज बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहे. यामध्ये एक पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, २५ सहाय्यक आणि पोलिस उपनिरीक्षक, ४२३ पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. याचबरोबर जिल्ह्यातील बंदोबस्तामध्ये एक पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, ७ पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सीआरपीसीचे सहा अधिकारी आणि ३३ जवान यांच्यासह दीड हजारहून अधिक पोलिसांचा समावेश आहे.
...
वाहतूक मार्गात बदल
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, कणेरी मठ शोभायात्रा, जोतिबा खेटे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे रविवारी (ता. १९) प्रमुख ठिकाणी एकेरी मार्ग दुहेरी करण्यात येत आहे. बिंदू चौक, शिवाजी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला राहणार आहे. खॉंसाहेबांचा पुतळा ते बिंदू चौक (दुर्गा हॉटेल) चौक एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला असेल. खरी कॉर्नर ते बिनखांबी मंदिरापर्यंत एकेरी मार्ग सर्व वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी खुला असेल. रविवारी (ता. १९) दुपारी दोन नंतर ते सायंकाळी सातपर्यंत सर्व एकेरी मार्गावरील वाहतूक दुहेरी सुरू असतील, त्यानंतर ते पूर्ववत एकेरी होतील.
--------------
ड्रोनद्वारे चित्रीकरणास बंदी
केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दौऱ्यावर असल्यामुळे सर्व मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी रात्री बारापासून ते १९ (रविवार) मध्यरात्री रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर विमानतळ परिसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास बंदी घातली आहे.
....
नऊ ठिकाणी पार्किंग व्यवस्था
शहा यांच्या दौऱ्यादिवशी रविवारी शहरातील विविध नऊ ठिकाणी पार्किंगची विनामोबदला सोय करण्यात आली आहे. त्यात भाजपच्या नूतन कार्यालयाची पायाभरणी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी मेरी वेदर मैदान (दुचाकी आणि चारचाकी वाहने), ईस्तर पॅटर्न मैदान (चारचाकी) आणि खानविलकर पेट्रोलपंप शंभर फुटी रोड (चारचाकी) वाहने पार्क करावयाची आहेत. शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांनी शहाजी कॉलेज (चारचाकी), चित्रदुर्ग मठ (दुचाकी), महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना (दुचाकी आणि चारचाकी), व्हीनस कॉर्नर गाडीअड्डा (चारचाकी), ईस्तर पॅटर्न मैदान (चारचाकी), प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे (दुपारी एक वाजल्यापासून चारचाकी) वाहने पार्क करावीत, अशी सूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेने पत्रकाद्वारे केली आहे.