खंडणीचा गुन्हा

खंडणीचा गुन्हा

प्लास्टिक विक्रेत्याकडे दोन लाखांची
खंडणी मागणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा
कोल्हापूर, ता. १७ ः दुकान सुरू ठेवण्यासाठी प्लास्टिक विक्रेत्या दुकानदाराकडे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात आज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अविनाश विलास शिंदे (रा. आंबेडकर चौक, गडमुडशिंगी, ता. करवीर), किरण रामा निखाळजी (रा. मार्केट यार्ड, जाधववाडी, कोल्हापूर), त्र्यंबक वसंत गवळी (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्यासह अन्य अनोळखी आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी राजकुमार रहंदीमल आहुजा (गांधी पुतळ्याशेजारी, गांधीनगर) यांचे लक्ष्मीपुरीत नेहा ट्रेडर्स ॲण्ड शांती स्टोअर नावाचे प्लास्टिक विक्रीचे दुकान आहे. काल (ता. १६) दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान लक्ष्मीपुरीतील या दुकानात संशयित आरोपी अनधिकृतपणे घुसले. तेथे आहुजा व त्यांच्या दोन्ही मुलांना ‘प्लास्टिकला महाराष्ट्रात बंदी आहे, तुम्ही बेकायदेशीर प्लास्टिक विक्री करता. तुम्हाला कळंबा, येरवडा जेलमध्ये टाकतो, दुकान कायमचे बंद करतो’, असे म्हणून सांगून शिवीगाळ केली. त्यांना सिंधी भाषेत बोलू नका, असे सांगून शिवीगाळ केली. तसेच, येथून पुढे दुकान सुरू ठेवण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशीही मागणी केली. त्या वेळी आहुजा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देणार, असे म्हटल्यावर संशयित आरोपींनी फिर्यादी आहुजा यांना शिवीगाळ करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास मनाई केली. तसेच, जबरदस्तीने खुर्चीत बसविले. त्यामुळे त्यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार जयश्री गुजर यांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक अंजना फाळके अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com