मावळा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळा पुरस्कार
मावळा पुरस्कार

मावळा पुरस्कार

sakal_logo
By

फोटो
...

शिवरायांचे कार्य वस्तुनिष्ठपणे सर्वदूर पोहचवा

डॉ. आ. ह. साळुंखे ः मावळा गौरव पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः ‘यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करावा. शिवाजी महाराजांविषयी कोणतीही चुकीची माहिती किंवा प्रतिमा तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच महाराजांचे कर्तृत्व वस्तुनिष्ठपणे सर्वदूर पोहचवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मिरजकर तिकटी येथील मावळा कोल्हापूर ग्रुपतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते डॉ. साळुंखे यांना मावळा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले की, ‘मावळा कोल्हापूरने प्रतापगडाची प्रतिकृती उभी केली आहे. त्यातून शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या स्मृतींना उजाळा लाभत आहे. भविष्यातील पिढ्यांनाही नवी दिशा देणारे कार्य मावळा ग्रुप करीत आहे. यातून समाज जोडला जाण्यास मदत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ‘मावळा’ शब्दाला महत्त्व आहे. त्यात पराक्रम आहे, कमालीची निष्ठा आहे. कोणाविषयी द्वेष किंवा मत्सर नसतो, त्यांच्यात समर्पणाची भावना असते. छत्रपती शिवाजी महाराज रयतेसाठी औरंगजेब, शाहिस्तेखानलाही स्वतः सामोरे गेले. अशा राजासाठी मावळेही प्राणाची बाजी लावून स्वराज्य रक्षणास तयार होते. म्हणून मावळा या शब्दाचे महत्त्व आजही अधोरेखित होते. त्याला साजेसे कार्य मावळा गट करतो आहे.’
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले की, ‘मावळा ग्रुप पुरोगामी व सत्यशोधक विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहे, ही कौतुकाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून प्रेरणा घेऊन समाज योग्य दिशेला नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. नव्या काळात लोकशाही टिकवणे अवघड दिसत असताना समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य कोल्हापुरात, राज्यात व देशात व्हावे. यासाठी सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी मावळा ग्रुप जागृती करेल, अशी अपेक्षा आहे.’ दरम्यान, पुरस्कार वितरणानंतर ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ या महानाट्याचे सादरीकरण झाले. उद्या, शनिवारी (ता. १९) देखील या महानाट्याचे सायंकाळी सात वाजता पुनर्सादरीकरण होणार आहे.
...

नव्या पिढीचाही पुढाकार...

रवींद्रनाथ टागोर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला होता. बंगाली बांधवांनाही ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे मराठीबांधवांसोबत म्हणावे, असे आवाहन केले होते. परराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याप्रति आदरभाव दिसतो. हा आदरभाव सर्वत्र वाढीस लागावा, यासाठी नवी पिढीही पुढाकार घेत असल्याचे मावळा ग्रुपच्या कार्यातून दिसते, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
...