
ईडी चौकशी
जिल्हा बँकेचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात
तीन माजी संचालकांना नोटीस ः अन्य संचालकांनाही लवकरच ईडीची नोटीस
कोल्हापूर, ता. १८ ः गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या ‘ब्रिक्स’ कंपनीला दिलेल्या कर्जप्रकरणी जिल्हा बँकेच्या आजी-माजी संचालकांची चौकशी ‘ईडी’ कडून होणार आहे. टप्प्याटप्प्याने संचालकांना नोटीस बजावण्यात येणार असून, यापूर्वी तीन माजी संचालकांना या नोटिसा मिळाल्या आहेत.
जिल्हा बँकेवर १ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने छापा टाकला. दोन दिवसांच्या चौकशीनंतर ईडीने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले, नंतर त्यांची सुटका झाली; पण आता ‘ब्रिक्स’ला दिलेल्या कर्जप्रकरणी हे कर्ज मंजूर करताना संचालक मंडळात असलेल्या संचालकांना ईडीने नोटीस बजावली आहे. पहिल्या टप्प्यात माजी संचालक अनिल पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर व विलास गाताडे यांना नोटीस पाठवण्यात आल्या. या सर्वांना १४ फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलवले होते, पण या सर्वांनी म्हणणे सादर करण्यास पंधरा दिवसांची मुदत मागितल्याचे समजते.
या तीन संचालकांशिवाय ब्रिक्सला कर्ज देताना संचालक असलेल्या व नसलेल्यांनाही ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकी तिघांना या नोटिसा पाठवण्याचे नियोजन आहे. सोमवारी यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल.
......