
Gag191_txt.txt
83737
‘क्षेत्रभेटीने विद्यार्थी सुजाण नागरिक’
गगनबावडा ः क्षेत्रभेटीद्वारे संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा अनुभव घेता येतो. तसेच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो व भावी सुजाण नागरिक बनवण्याच्या दृष्टीने उपयोग होतो, असे विचार गटविकास अधिकारी माधुरी परीट यांनी मांडले. परशुराम विद्यामंदिर शाळेने क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. पंचायत समितीची रचना व कामकाजाविषयीही माहितीच्या उद्देशाने भेटीचे आयोजन होते. श्रीमती परीट यांनी पंचायत समितीचे विभाग व त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती दिली. कक्ष अधिकारी उदय गोडवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध विभागांची ओळख करून दिली. मुख्याध्यापक आर. एम. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर गिरीबुवा यांनी उपक्रमाचे आयोजन केले. शिक्षिका सोनम गवस व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले.