दुचाकीच्या धडकेत दोघे मित्र ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीच्या धडकेत दोघे मित्र ठार
दुचाकीच्या धडकेत दोघे मित्र ठार

दुचाकीच्या धडकेत दोघे मित्र ठार

sakal_logo
By

मयत दोघांचे फोटो ८३८७३
अक्षय पाडळकर
संतोष पाटील
-----------
दुचाकीच्या धडकेत दोघे मित्र ठार
रजपूतवाडीत अपघात; खेट्याला निघालेले दाम्पत्यही जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : पन्हाळा-कोल्हापूर मार्गावरील रजपूतवाडीजवळ आज सकाळी दोन दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार झाले. अन्य तिघे जखमी झाले. अक्षय सुरेश पाडळकर (वय २४, रा. भोसलेवाडी) आणि संतोष बाळासाहेब पाटील (३०, रा. कदमवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या दुचाकीवरील नीलेश रवींद्र संकपाळ (३४, विठ्ठल मंदिर चौक, कदमवाडी) गंभीर जखमी आहे. जोतिबाच्या खेट्यासाठी चाललेले जयदीप जनार्दन कदम (४५ ) आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा (४० दोघे रा. लक्ष्मी कॉलनी टेंबलाईवाडी परिसर) जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अक्षय, संतोष आणि नीलेश गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत नोकरी करतात. शिवजयंतीनिमित्त पन्हाळा येथील वातावरण पाहण्यासाठी शनिवारी सायंकाळी तिघेही पन्हाळा गडावर गेले होते. आज सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास ते कोल्हापूरला येत होते. साडेसातच्या सुमारास रजपूतवाडीजवळ सई हॉटेलशेजारी रस्त्याकडेला ट्रॅक्टर उभा होता. त्याच्याजवळून जयदीप आणि सुवर्णा जात होते. तेव्हा अक्षय आणि जयदीप यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये अक्षय आणि संतोष जागीच ठार झाले. जयदीप आणि सुवर्णा जखमी झाले. अक्षय आणि संतोषच्या गाडीवरील नीलेशदेखील गंभीर आहे.
अपघातानंतर मृतांची ओळख लवकर पटली नाही. साधारण आठच्या सुमारास मृत भोसलेवाडी, कदमवाडीतील असल्याचे समजल्यावर परिसरातील स्थानिकांनी तिकडे धाव घेतली. नंतर त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात नेले. यावेळी नातेवाईक आणि मित्रांनी गर्दी केली होती. आमदार जयश्री जाधव यांनी संबंधितांच्या नातेवाइकांची भेट घेतली. अपघाताची वर्दी स्वप्नील राजाराम लोहार यांनी दिली.

तिसरी घटना आणि....
संतोष बाळासाहेब पाटील याचा यापूर्वी दोन वेळा पेठवडगाव आणि कसबा बावडा येथे अपघात झाला होता. त्यातून तो बचावला होता. आज तिसऱ्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. त्याच्या आईवडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या मागे ८० वर्षांची आजी आणि एक विवाहित बहीण आहे. अक्षय दहावीपर्यंत शिकला होता. त्याच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.