
शिवजयंती मिरवणूक
83950
....
समाज प्रबोधनाचा जागर
शिवाजी तरुण मंडळाची लक्षवेधी मिरवणूक, हलगी, घुमकं व कैताळाचा ठेका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : समाज प्रबोधनाचा जागर घालत शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक आज लक्षवेधी ठरली. हलगी, घुमकं व कैताळाचा ठेका, बाराबंदी पोशाखातील बाल मावळे, शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणूक मार्ग रोमांचित झाला.
मंडळातर्फे मिरवणुकीची जय्यत तयारी केली होती. सामाजिक प्रबोधनाचे फलक लावलेल्या बैलगाड्या निवृत्ती चौकात दुपारी चार वाजता थांबल्या होत्या. ‘राष्ट्रपुरुषांचा अवमान करणे, म्हणजे देशद्रोह ठरवा,’ ‘सर्वांनी नेऊया कोल्हापूरचा फुटबॉल सातासमुद्रापार,’ आदी फलक लक्ष वेधणारे होते. त्यामागे ट्रॅक्टरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज व श्रीरामाचे पुतळे होते. बालशिवाजी, जिजाऊ यांच्या वेशभूषा केलेली मुले- मुली घोड्यावर स्वार झाले होते.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे, आमदार जयश्री चव्हाण यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. हलगीच्या कडकडाटावर लेझिमची प्रात्यक्षिके सुरू झाली. शौर्यपीठावरील शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा मिरवणूक मार्गावर दाखल झाला. निवृत्ती चौकात मिरवणूक आल्यानंतर कपाळावर चंद्रकोर ल्यायलेल्या व भगव्या साड्या परिधान केलेल्या मुलींनी लाठीची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. वस्ताद मनोज शिंदे-बालिंगकर यांनी पट्टाफेक सादर करत टाळ्यांची दाद घेतली. बिनखांबी गणेश मंदिराच्या चौकात साडेसातच्या सुमारास मिरवणूक आली. महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर ते पुन्हा उभा मारुती चौक असा मिरवणुकीचा मार्ग राहिला. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, चंदक्रांत यादव, चंद्रकांत चव्हाण, लाला गायकवाड, अभिषेक इंगवले, परीक्षित पन्हाळकर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
दरम्यान, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे हुतात्मा पार्क येथे आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी वसंतराव मुळीक, फिरोज उस्ताद, महादेव पाटील, संभाजी जगदाळे, चंद्रकांत कांडेकर, लहुजी शिंदे, मारुती जाधव, प्रसाद जाधव, आयेशा खान, वहिदा खान, उमेश बुधले उपस्थित होते. मिरजकर तिकटी येथील मावळा कोल्हापूरतर्फे मधुरिमाराजे छत्रपती व आमदार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा झाला.
------------
शहराच्या विकासासाठी हद्दवाढ करा...
शहराच्या हद्दवाढीवर सातत्याने चर्चा होत आहे. हद्दवाढ मात्र होताना दिसत नाही. हद्दवाढ समर्थक व विरोधक आमने-सामने येत असल्याने हा तिढा सुटायला तयार नाही. परिणामी मिरवणुकीत हद्दवाढीच्या मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. ‘एकतर पन्नास वर्षे रखडलेली हद्दवाढ करा, नाहीतर कोल्हापूर महानगरपालिका ग्रामपंचायत म्हणून जाहीर करा. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे,’ असे त्यात म्हटले होते.
------------
गांधी मैदानाची व्यथा फलकावर
फलकावर गांधी मैदानाची व्यथा मांडण्यात आली होती. ‘जरा बघा माझ्याकडे, काय दुर्दशा झाली माझी, मैदानाचे झाले आहे विशाल माळरान, पाणी साचून उगवली झाडे-झुडपे तण, पोरा बाळांचे खेळायला होईना मन, मैदानावरील गांधीजींचे भरून आले नयन, विकसित करा अद्ययावत गांधी मैदान,’ असे कवितेतून आवाहन करण्यात आले होते.
------------
कोल्हापूरच्या फुटबॉलचीच हवा...
कोल्हापूरच्या फुटबॉलवर मार्मिक भाष्य करणारा फलक मिरवणुकीत होता. त्यावर ‘अखंड भारतात कोल्हापूरच्या फुटबॉलचीच हवा, मैदानावर जरूर ये भावा, पण खाऊन येऊ नकोस मावा, तोंडात ठेवून माव्याची गुठळी फेकू नको पाण्याची बाटली, लिंबू फेकताना लाज तुला कशी नाही वाटली, करू नका फुटबॉलबरोबर ईर्ष्या, आपण सारे राजर्षी शाहूंचे वारसदार, अंमलात आणूया त्यांचे आचार-विचार, पचवायला शिका जित अन् हार,’ असा मजकूर होता.