केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाई दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाई दर्शन

83832, 83933, 83891

छत्रपती शिवराय, लोकराजा शाहूंना अभिवादन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाई दर्शन; देशवासीयांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना

कोल्हापूर, ता. १९ ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. गृहमंत्री शहा यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृद्घी दे !’ अशी प्रार्थना केली. दरम्यान, गृहमंत्री शहा मंदिर परिसरात येताच उपस्थित भाजप कार्यकर्ते व भाविकांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष केला. त्यांनीही हात उंचावून उपस्थितांना प्रतिसाद दिला. दौऱ्यादरम्यान मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. गृहमंत्री शहा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर अतिशय कडक बंदोबस्तात केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मंत्री शहा यांच्यासोबत पालकमंत्री केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, रमेश दिवेकर, गिरीश साळोखे उपस्थित होते. अभिवादनप्रसंगी चारही रस्त्यावरील वाहतूक तसेच नागरिकांना अटकाव करण्यात आला. त्यासाठी जवळपास एक वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व व्यवसाय बंद केले होते. परिसरातील इमारतींवर तसेच रस्त्यांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. साडेतीन वाजता अभिवादन केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.


चौकट
अभिवादन केल्यानंतर लोकांना नमस्कार
छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देत केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री पाटील, खासदार महाडिक, श्री. घाटगे उपस्थित होते. दुपारी पावणेचारला श्री. शहा दसरा चौकात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण केला. अभिवादन केल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांना नमस्कार करत शुभेच्छा दिल्या.

चौकट
ताफा थांबवून कार्यकर्त्यांना अभिवादन
केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे विमानतळावर पालकमंत्री केसरकर यांनी स्वागत केले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस होते. विमानतळावच सकाळपासूनच भाजप कार्यकर्त्यांनी श्री. शहा यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. पण, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत सोडले नाही. मात्र, विमानतळावरून बाहेर पडताना श्री. शहा यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवून व काही काळ सुरक्षाकडे बाजूला ठेवून या कार्यकर्त्यांना हात करून अभिवादन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री. शहा यांच्यासह वंदे मातरम्‌, भारत माता की जय अशा घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला.

चौकट
सुरक्षा पास बिनकामाचे
मंत्री शहा यांच्या दौऱ्यासाठी प्रसार माध्यमांसाठी पिवळे पास दिले आहेत. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी श्री. शहा यांनी भेट दिली त्या-त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कोसो दूर ठेवले होते. ज्या ठिकाणी श्री. शहा यांना पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये प्रसार माध्यमांना उभे राहून वार्तांकन करावे लागले. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून दिलेल्या ‘बिनकामाच्या पास’ची चर्चा सुरू होती.

चौकट
पुतळ्याजवळ अटकाव
सकाळी शिवजयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर पोलिसांच्या ताब्यात होता. तिथे कोणाला जाऊ दिले जात नव्हते. तीनच्या दरम्यान भाकपचे भालचंद्र कानगो, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, प्रशांत आंबी, गिरीश फोंडे, आरती रेडेकर हे पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. बंदोबस्ताच्या कारणास्तव पोलिसांनी विनंती केल्यानंतर ग्रीलजवळूनच अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या. झेंडूच्या फुलांची ॲलर्जी असल्याने पुतळ्याजवळ झेंडूची फुले ठेवली नव्हती. त्यामुळे त्यांनी आणलेली फुलेही ठेवू दिली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com