
शिवतीर्थवर लोटला जनसागर
फोटो देत आहे.
--------------------------------------
शिवतीर्थवर लोटला जनसागर
इचलकरंजी शिवमय; वृक्षारोपण, रक्तदानासह विविध उपक्रम
इचलकरंजी, ता. १९ : शहरात विविध ठिकाणी व विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. त्यामुळे शहर शिवमय झाले होते. शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर गर्दी केली होती.
शहरातील बहुतांश मंडळांनी शिवतीर्थ येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करीत शिवज्योत प्रज्वलित करून मंडळापर्यंत नेली. तर काही मंडळांनी पन्हाळगड येथून शिवज्योत आणली. आमदार प्रकाश आवाडे, मुख्यमंत्री प्रधान सचिव विकास खारगे तसेच प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, आयुक्त सुधाकर देशमुख, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवजयंतीनिमित्त रविवारी पहाटेपासून वस्त्रनगरी छत्रपती शिवरायांच्या जयघोषणांनी दुमदुमली होती. शिवतीर्थावर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, सामाजिक संस्था पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शहरातील विविध सुमारे ४५० मंडळांनी शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. लहान-मोठ्या मंडपातून शिवरायांच्या मूर्तीची पूजा करून अभिवादन आणि जयंती साजरी केली. भगवे ध्वज, दुचाकीला लावून तसेच भगवे फेटे बांधून अनेकजण गटा-गटांने फिरताना दिसून आले. मंडळांनी शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदीसह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते शिवजयंती उत्सव शांततेने व उत्साहाने झाला.
-------
मोफत बूट पॉलिश
विविध मंडळे, संघटना, पक्ष यांनी उपक्रम राबवले होते. संत रविदास राष्ट्रीय विकास संघातर्फे शिवतीर्थ येथे आलेल्या शिवभक्तांचे मोफत बूट पॉलिश करून देण्यात येत होते.
---------
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य गीत म्हणून घोषित केलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीत शिवतीर्थावर गाण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.