राजकीय विश्‍लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय विश्‍लेषण
राजकीय विश्‍लेषण

राजकीय विश्‍लेषण

sakal_logo
By

अमित शहांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग
---
कार्यकर्त्यांना दिली ऊर्जा; जिल्ह्यातील दोन लोकसभा, दहा विधानसभा जिंकण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसह कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करीत भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकले. भाजपच्या जिल्ह्यातील शक्ती केंद्र, बूथ केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. श्री. शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याने भाजप कार्यकर्त्यांतही ऊर्जा निर्माण झाली.
दरम्यान, याच कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन्ही खासदार उपस्थित असल्याने श्री. शहा यांनी केलेल्या घोषणेमुळे खासदार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने श्री. शहा आज कोल्हापुरात होते. सायंकाळी त्यांनी भाजप कार्यालयाबाहेरील मैदानावर कार्यकर्त्यांना संबोधित केले. अन्य कार्यक्रमांच्या तुलनेत या कार्यक्रमातच त्यांनी कार्यकर्त्यांना राज्यातील ४८ लोकसभा व जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात भाजपला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती होती. त्या वेळी शिवसेनेची सूत्रे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. त्यातून जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीत शिवसेनेला मिळाल्या आणि कोल्हापुरातून शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांचा विजय झाला. या दोघांच्या विजयात भाजपच्या ताकदीबरोबरच स्थानिक राजकीय संदर्भ महत्त्वाचे ठरले. कोल्हापुरात ‘राष्ट्रवादी’चे त्या वेळचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उठवलेले रान, तर हातकणंगलेत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधातील नाराजी यातून मंडलिक व माने या दोघांचा विजय सुकर झाला.
आता लोकसभेला दोन्हीही जागा जिंकण्याचे आवाहन श्री. शहा यांनी केले असले, तरी त्यांचे उमेदवार कोण? याचे पत्ते मात्र त्यांनी खोलले नाहीत. सद्यस्थितीत दोन्ही काँग्रेससह भाजपकडेही लोकसभेसाठी तगडे उमेदवार दोन्ही मतदारसंघांत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत या दोन जागा ‘राष्ट्रवादी’कडे आहेत, त्यांच्याकडून अजून तरी या निवडणुकीची तयारीच दिसत नाही. भाजपचे संभाव्य उमेदवार खासदार धनंजय महाडिक हे राज्यसभेवर गेल्याने भाजपलाही उमेदवार शोधावा लागेल. अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रा. मंडलिक व श्री. माने यांना पाठिंबा देण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोघांनाच भाजपमध्ये आणून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आजच्या कार्यक्रमात या दोन खासदारांची उपस्थिती हे याचे संकेत आहेत.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना युती होती. त्यात जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदारसंघ शिवसेनेला, तर दोन भाजपला असे सूत्र ठरले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीनंतर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेले एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर व शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही सध्या शिंदे गटाबरोबर आहेत. त्याचबरोबर गेल्या विधानसभेतील विजयानंतर ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेत श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी भाजपला आघाडी करायची झाल्यास त्यांना या पाच जागा सोडाव्या लागतील. अन्य पाच जागांपैकी कोल्हापूर दक्षिणमध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे अमल महाडिक विजयी झाले होते, त्यामुळे या मतदारसंघात ते स्वतः किंवा त्यांच्या पत्नी सौ. शौमिका उमेदवार असू शकतील. हातकणंगले, चंदगडमध्ये भाजपकडे प्रभावी उमेदवार नाही. कागलमध्ये ‘राष्ट्रवादी’चे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जय्यत तयारी केली आहे. चंदगडमधून शिवाजी पाटील, तर हातकणंगलेतून ऐनवेळी भास्कर शेटे भाजपचे उमेदवार होऊ शकतात. पण, याचा निर्णय प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर होईल. तत्पूर्वी, होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत काय चित्र राहील, यावर विधानसभेची रणनीती ठरणार आहे.
................

खासदारांची कोंडी की मार्ग सुकर?
भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने हे दोन्हीही खासदार व्यासपीठावर होते. त्याचा उल्लेख करून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत उपस्थितांचा गैरसमज असला, तरी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या भाजपबरोबर असल्याचे सांगत यावर पडदा टाकला. श्री. शहा यांनी तर राज्यातील लोकसभेचे ४८ मतदारसंघ भाजप जिंकणार, असे सांगितले. यावरून शिवसेनेच्या या दोन खासदारांची निवडणुकीत कोंडी होणार की या जागा शिवसेनेला सोडल्या जाणार किंवा या दोघांना भाजपची उमेदवारी देऊन त्यांचा मार्ग सुकर होणार, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.
.......

आवाडेंच्या प्रवेशाची चर्चाच
श्री. शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी आज दिवसभर चालविले होते. प्रत्यक्षात ती चर्चाच राहिली. मात्र, श्री. आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल व स्नुषा सौ. मौसमी यांच्या हस्ते श्री. शहा यांचा वेगळा सत्कार करण्यात आला.
......