
बेळगाव ः येळ्ळूर संमेलन - अध्यक्ष भाषण
83919
येळ्ळूर : येथे रविवारी येळ्ळूर साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ॲड. सुधीर चव्हाण. व्यासपीठावर डॉ. मिलिंद कसबे, रावजी पाटील, परशराम मोटराचे, सरिता पाटील, महेश जुवेकर, संदीप खनूकर, आर. एम. चौगुले, सुरेंद्र बरगावकर, रमाकांत कोंडुसकर, परशुराम नंदीहळी, सतीश पाटील.
भाषा, साहित्य, कलेसह
लेखनावरही अतिक्रमणे
---
प्रा. डॉ. कसबे; प्रत्येकाने भूमिका घेण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १९ : भाषा, साहित्य, लेखन, कला या सगळ्यांवर आक्रमणे होत आहेत. ही आक्रमणे थांबवायची असतील तर लेखक, कलावंत आणि प्रत्येक सर्जनशील माणसाने भूमिका घेण्याची गरज आहे. समाजाला नवी ऊर्जा, दिशा या संमेलनाच्या माध्यमातून मिळते, असे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे आज येथे म्हणाले.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक ॲड. सुधीर चव्हाण, स्वागताध्यक्ष रावजी पाटील, संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, माजी महापौर सरिता पाटील, माजी ‘एपीएमसी’ सदस्य महेश जुवेकर, संदीप खनूकर, आर. एम. चौगुले, सुरेंद्र बरगावकर, रमाकांत कोंडुसकर, दुद्धाप्पा बागेवाडी, माजी आमदार परशुराम नंदीहळी, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील उपस्थित होते.
डॉ. कसबे म्हणाले, ‘‘आपण आपली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय बांधिलकी व अस्तित्व जाहीर करण्याची वेळ आली आहे. तरुण पिढीने व आताच्या नवीन पिढीने आपले आदर्श निश्चित केले पाहिजेत. आता चित्रपट कलाकारांना अनेक जण आपले आदर्श मानतात. मात्र, संत गाडगेबाबा, नारायण सुर्वे, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले खरे आदर्श आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आपला अभिमान आहेत. शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांना आधी समजून घेतले पाहिजे. येळ्ळूर ऊर्जादायी आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे, देशातील अनेक गावांनी समृद्ध कसे व्हावे, हा धडा या गावाकडून घेतला पाहिजे.’’
ते म्हणाले, ‘‘पहिल्यांदा सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधन होते. त्यानंतर राजकीय प्रबोधन होत असते. मात्र, सध्या चित्र बदलत चालले आहे. आपले सांस्कृतिक वैभव पुन्हा मिळविण्यासाठी आपल्याला आधुनिक व्हावे लागेल.’’
ते म्हणाले, ‘‘विचाराने आधुनिक होणे हे जबाबदारीचे, जोखमीचे काम आहे. गौतम बुद्ध यांना पहिले आधुनिक महापुरुष म्हणावे लागेल. संत तुकाराम, कबीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक व्यक्ती आहेत. आपल्याला जाती-धर्माचे अहंकार सोडावे लागतील, तरच आपण आधुनिक होऊ. या व्यवस्थेत उभे राहण्यासाठी स्वतःची वाट स्वतः निर्माण करावी लागेल.’’
कोट...
२०२४ ही शेवटची निवडणूक आहे की काय, असे वाटावे, असे चित्र निर्माण केले जात आहे. सद्यस्थितीत आपण ज्या वळणावर चालत आहोत, तेथे प्रत्येकाच्या मनात असुरक्षितता आहे.’’
- प्रा. डॉ. मिलिंद कसबे, संमेलनाध्यक्ष, येळ्ळूर