
सुमंगल लोकोत्सव
सुमंगलम लोकोत्सवाचा आज प्रारंभ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती ः २६ फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण, सांस्कृतिक जागर
कोल्हापूर, ता. १९ ः पर्यावरण जनजागृती संदेशासह कला, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कणेरीच्या सिद्धगिरी मठावर आयोजित पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सवाचे उद्घाटन उद्या (ता. २०) होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात रोज विविध विषयांवरील व्याख्याने, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि देशभरातील २८ राज्यांतील संस्कृतीचे दर्शन पाहायला मिळणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित रहाणार आहेत.
तारांगणचे उद्घाटन, प्रदर्शन गॅलरी, स्टॉल, सोळा संस्कार गॅलरी, पंचमहाभूततत्त्व गॅलरी, सेंद्रिय शेती यासह अनेक ठिकाणी सर्व मान्यवर भेट देतील. काडसिद्धेश्वर स्वामी हे या सर्वांची माहिती देतील. सकाळी अकरा वाजता मुख्य सभामंडपात प्रारंभाचा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.