
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
gad203.jpg
84042
गडहिंग्लज : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
गडहिंग्लजला आंदोलन; विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. भर उन्हात प्रांत कार्यालयासमोरच ठिय्या मारला होता. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात अंगणवाडी सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना तुटपुंजे मानधन मिळते. शासन त्यांना मानसेवी समजते. त्यांना कामगार कायद्याचे कोणतेही संरक्षण मिळत नाही. महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनवाढीची पूर्तता करावी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील मुद्दे मान्य करावेत आदी मागण्यासाठी संपाचा इशारा दिला होता. मात्र, शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान, येथील लक्ष्मी मंदिरात अंगणवाडी सेविका, मदतनीस जमल्या. दुपारी एकला मोर्चाला प्रारंभ झाला. बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्वर रोड, मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. आमच्या मागण्या मान्य करा..., हम सब एक है... आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांनी भर उन्हात प्रांत कार्यालयासमोर रस्त्यावरच ठिय्या मारला.
माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक यांची भाषणे झाली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम पूर्णवेळ आहे. मात्र, मानधन अर्धवेळचे दिले जाते. सरकार कोणतेही आले तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. कोणत्याच शासनकर्त्याला पाझर फुटलेला नाही. आता थांबायचे नाही. ही लढाई ‘आर-या-पार’ची असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचारी सभेच्या जिल्हा अध्यक्षा अंजना शारबिद्रे, उपाध्यक्षा सुरेखा गायकवाड, तालुका अध्यक्षा राजश्री बाबन्नावर, भक्ती येसरे, वैशाली बिरंजे, नीता देसाई, शोभा जाधव, वंदना साबळे, मंजुळा कोरवी, रुपाली नार्वेकर, रेणुका शिरगावे, कांचन जाधव, राजश्री भोसले, दीपाली पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
-------------------
* दररोज धरणे आंदोलन
राज्यव्यापी बेमुदत संपात गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत. येथील प्रांत कार्यालयासमोर दररोज धरणे आंदोलन केले जाणार आहे. संप मिटत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे यांनी सांगितले.