
तनिष्का समुपदेशन
लोगो
...
शुक्रवारी महिलांसाठी मोफत समुपदेशन
‘तनिष्का’तर्फे आयोजन ः ‘मनात साचलेलं बोला, आम्ही तुमचं ऐकतोय’
कोल्हापूर, ता. १३ ः ‘आमचे म्हणणे ऐकण्यासाठी कुणीच नाही,’ अशी भावना अनेक महिलांच्या मनात असते. मात्र, तनिष्का व्यासपीठाने पुढाकार घेत महिलांच्या मनातील ऐकायचे ठरवले आहे. त्याअंतर्गत येत्या शुक्रवारी (ता. २४) केवळ महिलांसाठी मोफत वैयक्तिक समुपदेशन आणि प्राथमिक मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘सकाळ’च्या उद्यमनगर येथील कार्यालयात हा कार्यक्रम होईल.
सध्याची बदललेली जीवनशैली, वाद, नातेसंबंध यामुळे अनेक महिला सतत तणावाखाली असतात. आपल्या मनातील अनेक भावना त्या दडपून टाकतात किंवा सहन करत राहतात. महिलांना मोकळे होण्याची संधीच मिळत नसल्याने त्यांच्यात हतबलता येते. त्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. कोरोनानंतर कौटुंबिक समस्यांचे प्रमाण वाढलेले आहे. नैराश्य, आर्थिक चणचण, घरात बसून त्रासलेली अवस्था यामुळे निर्माण झालेले अनेक वाद घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. कौटुंबिक समस्या योग्य मार्गाने सोडवल्या जाव्यात आणि महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, यासाठी तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी मोफत समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वरिष्ठ विवाह समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांचे यासाठी मार्गदर्शन असून, संध्या वाणी आणि माधुरी शिंदे या महिलांना समुपदेशन करणार आहेत. यासाठी ७४४७४ ५२३३२ या क्रमांकावर केवळ व्हॉट्सअॅपद्वारे नावनोंदणी करावी. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. उर्वरित महिलांना समुपदेशकांच्या वेळेनुसार पुढील वेळ कळवली जाईल.
...........