
दरपत्रक
घरफाळा, पाणीपट्टी जैसे थे...
नगररचना, परवाना विभागांची १० टक्के, तर ‘इस्टेट’ची १५ टक्क्यांपर्यंत वाढ
कोल्हापूर, ता. २० : महापालिकेने पुढील महिन्यात सादर करण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. विविध विभागांनी आगामी वर्षासाठी दराचे प्रस्ताव सादर केले असून घरफाळा तसेच पाणीपट्टीत कोणतीही वाढ सुचवलेली नाही. इस्टेट विभागाने १० ते १५ टक्के, तर परवाना विभागाने १० टक्के वाढ सुचवली आहे. नगररचना विभागाने १०.५१ टक्के वाढ करत वार्षिक उत्पन्नात दोन कोटींची भर घालण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी २० फेब्रुवारीपर्यंत विविध विभागांना दराचे प्रस्ताव सादर करावे लागतात. सध्या प्रशासक असले तरी विभागांकडून प्रस्ताव घेऊन त्यानुसार प्रशासक त्यावर अंतिम निर्णय घेतात. विभागांनी प्रस्ताव दिले आहेत. घरफाळ्यात २०१२ नंतर वाढ झाली नसल्याने यंदा वाढ करण्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी विभागाला रहिवासी मिळकतींना पाच व दहा टक्के, तर व्यावसायिक मिळकतींना ४० टक्के वाढ केल्यास किती उत्पन्न मिळू शकते याचा अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानुसार विभागाने माहिती दिली होती, पण त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यंदा घरफाळ्यात वाढ होणार नाही. पाणीपट्टीत २०२१-२०२२ मध्ये काही वाढ केली होती. त्यामुळे यंदा काही वाढ केलेली नाही.
नगररचना विभागाकडून मोठे उत्पन्न मिळते. त्यातही विकास कर व प्रिमिअममधून जादा महसूल मिळतो. यंदा ५७ कोटींचे उद्दिष्ट असलेल्या विभागाने या दोन शुल्कांमध्ये वाढ करून ५९ कोटींचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याबरोबरच परवाना विभागाकडून १०० विविध व्यवसायांना परवाना शुल्क आकारणी केली जाते. गेल्या पाच वर्षांत विविध कारणांनी त्यात वाढ केलेली नव्हती. आता दहा टक्के वाढ सुचवली असून पावणेचार कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. इस्टेट विभागांतर्गत असलेले अंबाई व रमणमळा जलतरण तलाव, मैदान, हॉलच्या शुल्कात १० ते १५ टक्के वाढ सुचवली आहे. तसेच जलतरण तलाव खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बॅच ठेवली जाणार आहे.
-------------------
चौकट
जलतरण तलावांचे वाढणार शुल्क
तासाला २५ वरून ५० रुपये
वार्षिक पास तीन हजारांवरून ५ हजार