अध्यात्माला विज्ञानाची जोड देत पंचमहाभूतांचा जागर

अध्यात्माला विज्ञानाची जोड देत पंचमहाभूतांचा जागर

फोटो (KOP23L84172)
(KOP23L84169)

...........................................

अध्यात्माला विज्ञानाची जोड देत ‘पंचमहाभूतांचा जागर’

सिद्धगिरीमठावर अभ्यासक, नागरिकांची गर्दी; लोकोत्सवात संस्कृती, परंपरेचे घडणार दर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः ‘जीवनशैली ठिक, तर सर्व काही ठिक’ असे ब्रीद असलेल्या आणि अध्यात्माला विज्ञानाची जोड देत पंचमहाभूतांच्या तत्त्‍वांचा सात दिवस जागर चालणारा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आजपासून खुला झाला. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरीमठावर पर्यावरणपूरक जीवनशैली, सेंद्रिय शेती, अध्यात्म आणि आयुर्वेदाचे महत्त्व, पाच हजार वर्षांपूर्वीची परंपरा जाणून घेण्यासाठी देशभरातील अभ्यासक, शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांनी गर्दी केली.
मुख्य सभामंडपातील लोकोत्सवाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात झाला. या कार्यक्रमानंतर तारांगण, प्रदर्शन गॅलरी, सोळा संस्कार गॅलरी, जल-वायू-अग्नी-आकाश-पृथ्वी या पंचमहाभूत तत्त्वांची माहिती देणाऱ्या गॅलरीकडे नागरिक, अभ्यासक, विद्यार्थी, शेतकरी यांची पावले वळली. लोकोत्सवात भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी मठाने जिल्ह्यातील विविध गावांच्या मदतीतून जेवणाची व्यवस्था केली आहे. भाजी-भाकरी, चपाती, लहान बुंदी, भात-आमटी अशा भोजनाचा शेकडोजणांनी पहिल्या दिवशी दुपारी दोन ते चार या वेळेत आस्वाद घेतला. पर्यावरणपूरक जीवनशैली, सेंद्रीय शेती, आयुर्वेदाचे महत्त्व सांगणाऱ्या कक्षांमध्ये अनेकजण बारकाईने माहिती घेत होते. गाय आणि गाढव पाळण्याचे महत्त्व जाणून घेतले. विविध कलाकृती, सजावट पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बहुतांशजणांनी या कलाकृती मोबाईलमध्ये टिपून घेतल्या. बहुतेकजण आपल्या कुटुंबियांसमवेत आले होते. लोकोत्सवात रोज सायंकाळी सात वाजता संस्कृती दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी देशभरातून कलाकार मठावर दाखल झाले आहेत.
दरम्यान, विविध लोकोपयोगी स्टॉलची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली. महसूल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलचे दीप प्रज्वलन तर पर्यावरण व वातावरणीय बदल आणि प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे या वेळी उपस्थित होते.
...

चौकट
पंचतत्त्‍वाच्या संरक्षणाची घेतली शपथ

काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक विजू माने यांनी ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाची निर्मिती केली आहे. अवघ्या २० मिनिटांमध्ये ५० कलाकारांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी यावेळी पंचमहाभूत संरक्षणाची शपथ उपस्थितांना दिली. ट्रस्टचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, हिंदूराव शेळके आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, उदघाटनाच्या कार्यक्रमावेळी शाहीर डॉ. आझाद नायकवडी, मनीषा नायकवडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध पोवाडे, महाराष्ट्र गीत सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले.
...

लोकोत्सवात आज
या लोकोत्सवात उद्या, मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘आकाश तत्व’ (युवा संवाद) यावर चर्चासत्र होणार आहे. त्यात युवकांची पर्यावरण विषयक जबाबदारी या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ, कुलगुरू, प्राचार्य आणि विविध राज्यातील विद्यार्थी संवाद साधणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com