सेंद्रिय शेती अभियान २५ लाख हेक्टरमध्ये

सेंद्रिय शेती अभियान २५ लाख हेक्टरमध्ये

84203
कणेरी (ता. करवीर) ः येथील सिद्धगिरीमठातर्फे आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचे उद्‍घाटन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यावेळी (डावीकडून) दीपक केसरकर, देवेंद्र फडणवीस, अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी, भय्याजी जोशी, चंद्रकांत पाटील, महेश शिंदे, प्रकाश आवाडे, धैर्यशील माने. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

सेंद्रिय शेती अभियान २५ लाख हेक्टरमध्ये
मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा; ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सवाचा शानदार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः राज्याचा पर्यावरणपूरक सर्वांगीण विकास साधण्यावर सरकारचा भर आहे. या अंतर्गत आता राज्यातील २५ लाख हेक्टर जमिनीत सेंद्रिय (नैसर्गिक) शेती अभियान राबविले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सेंद्रिय खतांना अनुदान देण्याचा विचार आहे. पंचमहाभूतांचे संतुलन आणि पर्यावरणाचा समतोल साधत समृद्धी, विकासाच्या दिशेने वाटचाल करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठातर्फे आयोजित सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले प्रमुख उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील व्यक्ती, महाराष्ट्र-कर्नाटकसह अन्य राज्यांतून आलेले भाविक, नागरिकांच्या उपस्थितीत मंगलवाद्यांचे सूर अशा उत्साही वातावरणात ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्सवाचा शानदार प्रारंभ झाला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘लोकोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या हिताचा संकल्प केल्याबद्दल अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामींना धन्यवाद देतो. लोकोत्सवात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंचमहाभूतांच्या असंतुलनामुळे हवामानातील बदल होऊन विविध नैसर्गिक आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. त्याला आपणच जबाबदार आहोत. पर्यावरणपूरक वाटचालीसाठी या लोकोत्सवातून सुचविलेल्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. पर्यावरण रक्षण, स्वावलंबी शेतकरी, वेस्ट टू वेल्थ, रोजगारनिर्मिती आदींबाबतची दिशा घेऊन विकासाची पाऊले टाकूया. लोकोत्सवाला चळवळ बनवून त्याची राज्यभर व्याप्ती वाढवूया.’’
फडणवीस म्हणाले, ‘‘मानवता, सभ्यता, पर्यावरणासह आपल्या अस्तित्वाचा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. अगदी योग्यवेळी लोकोत्सव होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी आता जागे झालो नाही, तर भावी पिढीला काहीही देऊ शकणार नाही. त्यासाठी जीवनशैली बदलावी लागेल. पंचमहाभूतांचे रक्षण ही बोर्डरूम चर्चा राहिली नसून, वास्तव बनले आहे. पर्यावरण रक्षणासाठी शाश्‍वत विकास आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने असा लोकोत्सव राज्यातील अन्य शहरांत राबविता येईल. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी यापुढेही संघटितपणे कार्यरत राहावे. काडसिद्धेश्‍वर स्वामी आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांनी पर्यावरणरक्षण, शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले. सिद्धगिरी मठ ज्ञानाचे भांडार आहे.’’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘लोकोत्सवात पाच हजार वर्षांच्या परंपरेचे दर्शन घडते. या उपक्रमाचे स्वामित्व शासनाने स्वीकारले; पण स्वायत्तता कायम ठेवली. या लोकोत्सवाच्या उद्देशावर यापुढेही काम व्हावे.’’ भय्याजी जोशी म्हणाले, ‘‘भारत देवभूमी असून, तिच्या रक्षणासाठी निसर्गाशी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. लोकोत्सवाच्या माध्यमातून राजकीय, शासकीय, आध्यात्मिक घटक एकत्रित आले आहेत.’’ केसरकर म्हणाले, ‘‘आध्यात्म, विज्ञानाचा संगम लोकोत्सवात आहे. शेतकऱ्यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीवर भर द्यावा.’’
या वेळी पर्यावरणपूरक तीन लाख कापडी पिशव्यांच्या वितरणाचा प्रारंभ झाला. आमदार प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, महेश शिंदे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ए. वाय. पाटील उपस्थित होते. संजय भुसकुटे यांनी सूत्रसंचालन केले.

राजकारणात जाणार नाही...
अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी म्हणाले, ‘‘कर्करोग, मानसिक तणावाचे वाढते रुग्ण पंचमहाभूतांच्या असंतुलनाचा परिणाम आहे. ते रोखण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने कृतिशील प्रबोधन लोकोत्सवातून केले जात आहे. पर्यावरण रक्षण, रोजगारनिर्मितीची पाऊल टाकले जाईल. संन्यासासारखा मोठा अलंकार नाही. त्यामुळे या जन्मात तरी राजकारणात जाणार नाही. लोकोत्सवाला शासनाची चांगली मदत झाली.’’

शेतीसाठी चार हजार मेगावॉट वीज
फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला कर्करोगाची राजधानी होण्यापासून वाचविण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्‍यक आहे. त्यासाठी राज्यात २५ लाख हेक्टरमध्ये नैसर्गिक शेतीला पाठबळ दिले जाईल. सौरऊर्जेद्वारे आठ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करून त्यातील चार हजार मेगावॉट वीज शेतकऱ्यांना देऊ. अपारंपरिक स्रोतांद्वारे १२ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे ध्येय आहे.’’

पंचगंगेचे प्रदूषण कमी करणार
फडणवीस म्हणाले, ‘पंचगंगा इतकी प्रदूषित झाली आहे, की तिला गंगा म्हणावे की नाही, असे वाटते. कारखाने, शहर-गावांतील सांडपाणी नदीत मिसळत आहे. अमृत योजनेद्वारे एसटीपी प्लँट उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रदूषण कमी करण्याकडे लक्ष देऊ.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com