परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ
परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

परीक्षा केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ

sakal_logo
By

84262

परीक्षा केंद्र शोधण्यासाठी
विद्यार्थ्यांची धावपळ

बारावीची परीक्षा सुरू; प्रवेशपत्रातील अपुऱ्या माहितीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः प्रवेशपत्रावर (हॉल तिकीट) परीक्षा केंद्राचे पूर्ण नाव, पत्ता नसल्याने आणि मुख्य केंद्राऐवजी उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था असल्याचे अचानक समजल्याने बारावीच्या पहिल्याच पेपरवेळी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी कोल्हापुरातील काही विद्यार्थ्यांना आज धावपळ करावी लागली. प्रवेशपत्रातील अपुऱ्या माहितीचा त्यांना फटका बसला. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभाराबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्यात बारावीची ६८ परीक्षा केंद्रे आहेत. त्याठिकाणी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून परीक्षार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी येऊ लागल्या. बहुतांशजणांसमवेत त्यांच्या कुटुंबातील किमान एकतरी सदस्य होता. १० वाजेपर्यंत परीक्षार्थींच्या गर्दीने परीक्षा केंद्रांचा परिसर फुलला. आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत काहींनी नोटस, पुस्तकांवर उजळणीची अखेरची नजर टाकली. ‘नीट पेपर सोडव’, ‘टेन्शन घेऊ नको’, अशा पालकांच्या सूचना, मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा स्वीकारत परीक्षार्थींनी केंद्रात प्रवेश केला. प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि इतर साहित्याची तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी २ वाजून १० मिनिटे यावेळेत इंग्रजी विषयाचा पेपर झाला.
दरम्यान, प्रवेशपत्रावर नोंद केलेल्या केंद्रांवर काही विद्यार्थी, पालक सकाळी पावणेदहा ते सव्वा दहाच्या दरम्यान आले. मात्र, त्यांना त्या केंद्राऐवजी उपकेंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचे समजले. काहींना परीक्षा केंद्रांच्या नावातील सारखेपणा, केंद्राचे पूर्ण नाव, पत्ता प्रवेशपत्रावर नसल्याने अधिकृत बैठक व्यवस्था असलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली. यावेळी काही केंद्रप्रमुख, शिक्षकांनी या परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन, मदत केली.
...

केंद्राचे पूर्ण नाव, पत्ता द्या
या परीक्षांसाठी शिक्षण मंडळ प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शुल्क घेते. त्यामुळे प्रवेशपत्रावर संबंधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्राचे पूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंदविण्यास या मंडळाला काय अडचण आहे? किमान शाळांनी तरी परीक्षा केंद्राचा पत्ता जाणून घेण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
...
प्रश्‍नात घोळ, विद्यार्थ्यांचा संभ्रम
इंग्रजीच्या प्रश्‍नपत्रिकेतील ए-थ्री, फोर, फाईव्ह उपप्रश्‍न नव्हते. ए-फाईव्हमध्ये कवितेवरील प्रश्‍नाऐवजी थेट उत्तर दिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
...

कोट
पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने थोडी भीती वाटत होती. मात्र, पेपर चांगला गेल्याने तणाव कमी झाला आहे.
- पूर्वा मोहिते, कसबा बावडा
...
इंग्रजीचा पेपर सोपा होता. तो सोडविण्यासाठी वेळ कमी पडला. पेपरमधील ए-फाईव्हमधील प्रश्‍नाऐवजी थेट उत्तराने संभ्रम निर्माण झाला.
- यश आंबेकर, मणेरमळा
...
पेपरला १७०९ जणांची ‘दांडी’
या पेपरसाठी कोल्हापूर विभागातील एकूण १७० केंद्रांवर १,२०,०८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १,१८,३७१ जणांनी परीक्षा दिली. एकूण १७०९ जण गैरहजर राहिले. पेपरदरम्यान एकही कॉपीचा प्रकार निर्दशनास आला नसल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. एस. पवार यांनी सांगितले.