
अंगणवाडी सेविका संप
अंगणवाडी सेविकांचा उद्या
खासदारांच्या घरांवर मोर्चा
कोल्हापूर, ता. २१ ः अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपाची कोल्हापुरात सुरुवात झाली असून, आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा खासदारांच्या निवासस्थानांवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना मानधन वाढ, मराठीतून पोषण ट्रॅकर, ग्रॅच्युईटी या व इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील दोन लाख सेविका मदतनीस बेमुदत संपावर आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शंभर टक्के सहभाग घेतला आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून गुरुवारी सेविका, मदतनीस या कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानांवर मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडणार आहेत. यासंबंधीची माहिती अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आप्पा पाटील, जयश्री पाटील, सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, शुभांगी पाटील, शोभा भंडारे, विद्या कांबळे, शमा पठाण यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
-----
संप मोडून काढल्यास संघर्ष
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मोडून काढल्यास संघर्ष उद्भवेल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने पत्रकाद्वारे दिला. तसेच जिल्ह्यातील आमदारांपर्यंत मागण्या पोहचविण्यासाठी संघातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, जुलेखा मुलाणी, लता कदम, उषा कडोकर, प्रियांका पाटील, आक्काताई उदगावे, उमा बनगे, मनीषा कुलकर्णी, संगीता पवार यांनी दिली आहे.