आर्थिक फसवणुक - लुक आऊट नोटीस

आर्थिक फसवणुक - लुक आऊट नोटीस

ए. ए. ट्रेडर्सच्या संचालक, एजंटांना
‘लूक आउट’ नोटीस लागू होण्याची शक्यता
---
१२ कंपन्यांचे सव्वापाच कोटी गोठविले; ‘फॉरेन्सिक ऑडिट’लाही परवानगी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः आर्थिक फसवणूक करून परदेशात पळून जाऊ नये म्हणून ए. ए. ट्रेडर्सच्या संचालक-एजंटांसह संबंधितांना ‘लूक आउट’ नोटीस बजावण्याबाबतचा प्रस्ताव तपास अधिकाऱ्यांनी पाठविला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न १२ कंपन्यांची सुमारे सव्वापाच कोटींची रक्कम गोठवली आहे. या सर्व कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी ‘फॉरेन्सिक ऑडिट’लाही परवानगी मिळाल्याचेही तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः जादा परतावा, दामदुप्पट अशा वेगवेगळ्या आमिषांनी कोट्यवधींची गुंतवणूक घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी २०० हून अधिक गुंतवणूकदारांनी फिर्याद दिली आहे. शाहूपुरी पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. यातील अनेक गुंतवणूकदारांकडून संचालक- एजंटांना कोट्यवधींची रक्कम मिळाल्याचे तपासात प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे ते देशातून पळून परदेशात जाऊ नयेत, यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे कोणत्याही विमानतळावरून संशयित आणि गुन्हा दाखल असलेली व्यक्ती पळून जात असेल तर त्याची माहिती पोलिसांना मिळेल. याद्वारे त्यांना अटक केली जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले. तसेच, काल (ता. २०) अटक केलेला ‘ट्रेडविंग्स’ कंपनीचा संचालक विक्रम नाळे याच्याही बॅंकेतील व्यवहाराची माहिती मिळाली आहे. त्यावर तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून तपास अधिक सूक्ष्म होण्यासाठी आता ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस महासंचालकांकडून परवानगी मिळाली आहे. सुमारे २०० हून अधिक गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती आता आणखी वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com