गड-कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना

गड-कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना

कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेचे कवित्व कायम
नवीन यादीकडे लक्ष; साडेचार हजार शेतकरी अद्याप प्रतीक्षेतच

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचे कवित्व संपता संपेना झाले आहे. लाभार्थ्यांच्या आतापर्यंत दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अद्यापही तालुक्यातील साडेचार हजार शेतकरी प्रोत्साहन लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने अवलंबलेल्या कूर्मगतीमुळे ‘मेरा नंबर कब आयेगा’ असे म्हणण्याची वेळ प्रामाणिक शेतकऱ्यांवर आली आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबविली. थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र, थकबाकीदारांना कर्जमाफी दिल्यामुळे कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांत नाराजीची भावना निर्माण झाली. कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही लाभ देण्याची मागणी झाली. त्यामुळे शासनाने प्रोत्साहनपर लाभ योजना आणली. २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा या योजनेच्या लाभासाठी विचार केला आहे.
शासनाने विविध निकष लावत पात्र लाभार्थी निवडले आहेत. त्यांना लाभापोटी ५० हजार रुपये देण्याची तरतूद केली. मात्र, या शेतकऱ्यांना एकाचवेळी लाभ देणे शासनाला शक्य झालेले नाही. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने दोन याद्या प्रसिद्ध केल्या. गडहिंग्लज तालुक्यातील साडेअठरा हजार शेतकरी पात्र आहेत. यातील चौदा हजार शेतकऱ्यांचा या दोन यादीत समावेश झाला आहे. मात्र, अद्यापही साडेचार हजार शेतकरी लाभापासून वंचित आहेत. नवी यादी कधी प्रसिद्ध होईल, याकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत. आपल्यासोबतच्या अन्य शेतकऱ्यांची नावे आधीच्या यादीत प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, आपलेच नाव नसल्याने त्यांना चिंता लागून राहिली आहे.

चौकट...
‘मार्च एंड’ची जोडणा...
अनेक शेतकऱ्यांनी विविध कारणांसाठी स्थानिक पतसंस्था, बँकांतून कर्जाची उचल केलेली आहे. मार्च महिना जवळ आल्यामुळे पतसंस्था, बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. प्रोत्साहनपर योजनेच्या लाभाची रक्कम मिळाली तर तेच पैसे अन्य कर्जाच्या ठिकाणी वळविण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पण, शासनाने उर्वरित शेतकऱ्यांची नवी यादी वेळेत जाहीर केली तरच हे शक्य होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com