पुलाचा आराखडा पाहणी

पुलाचा आराखडा पाहणी

84702
कोल्हापूर : शहरातील उड्डाणपुलासाठी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

एकच अखंड उड्डाणपुलाचे नियोजन
अधिकाऱ्यांनी केली संयुक्त पाहणी; साडेसहा किमी लांबी, एक हजार कोटी खर्च अपेक्षित
कोल्हापूर, ता. २२ : शिरोली जकात नाक्यापासून शिवाजी पुलापर्यंत एकच अखंड उड्डाणपुलाचे नियोजन केले जात आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या पुलासाठी एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यावरून ठिकठिकाणी उतरण्यासाठी पाच रस्ते दिले जाणार आहेत. त्याबाबत महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज संयुक्त पाहणी केली. महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प सल्लागारांकडून दोन दिवसांत प्रारूप आराखडा बनवला जाणार आहे.
बास्केट ब्रिजच्या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शहरांतर्गत उड्डाणपुलासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या सूचनेनुसार माजी आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासनाची इतर विभागांतील अधिकाऱ्यांची महापालिकेत संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी संयुक्त पाहणी करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार मुख्य उड्डाणपुलासोबत शिये टोल नाका ते सीपीआर चौक, शाहू टोल नाका ते फुलेवाडी तसेच उचगाव ते गारगोटी या रस्त्यांबाबतची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तुषार शिरगुपे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर आदींनी पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी महापालिकेत बैठक झाली.
याबाबत शहर अभियंता सरनोबत माहिती देताना म्हणाले, ‘‘सीपीआर चौकापर्यंत काही अडचण नाही. तिथून शिवाजी पुलापर्यंत अरूंद, तसेच वळणांचा रस्ता आहे. त्यासाठी सीपीआर चौकातून शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपुलासाठी चर्चा झाली. त्यासाठी तेथील जागांची माहिती जमा केली जात आहे. यापूर्वी मुक्त सैनिक वसाहत ते कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक तसेच सीपीआर चौक ते शिवाजी पूल असे तीन वेगवेगळे पूल सुचवले होते. आता सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकच पूल करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. कावळा नाका, वटेश्‍वर मंदिर, दाभोळकर चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक येथे उतरण्यासाठी रस्ता दिला जाणार आहे. सध्याची लांबी साडेसहा किलोमीटरची असून सीपीरआरपासून मार्ग बदलला तर त्याच्या लांबीत वाढ होईल. प्राधिकरणाच्या प्रकल्प सल्लागारांना दोन दिवसांत प्रारूप आराखडा तयार करण्यास सांगितला आहे. त्यानंतर तो मंत्री गडकरी यांच्याकडे सादर केला जाणार आहे.’’
----------------
चौकट
अन्य उड्डाणपुलांचेही आराखडे
या पुलाबरोबरच शिये टोल नाका ते सीपीआर चौक, शाहू टोल नाका ते फुलेवाडी, उचगाव ते गारगोटी या रस्त्यांच्या रूंदीकरणाबरोबरच कोठे उड्डाणपुलांची गरज आहे, याचेही प्राथमिक आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठीही पाहणी केली असून केंद्र वा राज्य सरकारच्या इतर योजनांमधून त्याला निधी मिळवण्याचे नियोजन केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com