चक्का जाम

चक्का जाम

फोटो
...

‘स्वाभिमानी’चे जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन

ठोस निर्णय न घेतल्यास अधिवेशनामध्ये विधानसभेवर धडक देणार


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : ऊस तोडणी मुकादमांकडून होणारी फसवणूक तत्काळ थांबली पाहिजे, फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, उन्हाळ्याचा तडाखा जाणवत असताना महावितरणकडून बिलासाठी वीज कनेक्शन तोडली जात आहेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, चंदगड, गडहिंग्लज, कुडित्रे, राधानगरीसह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर जोरदार घोषणा देत चक्काजाम करत शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नावर ठोस निर्णय न घेतल्यास अधिवेशनामध्ये विधानसभेवर धडक दिली जाईल, इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.
....

कोल्हापूर- राधानगरी राज्यमार्ग अडवला
राशिवडे बुद्रुक : शेतकऱ्यांना शेतीसाठी दहा तास वीज मिळावी व अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्ग अडवला. परिते येथे चक्काजाम करण्यात आले होते. यामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली होती. संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनाला शेतकरी वर्गातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. ठिकपुर्ली फाट्यावर सकाळी रास्ता रोको करण्यात आले. यामुळे कोल्हापूर'' राधानगरी'' गारगोटी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

....

गारगोटी-कोल्हापूर राज्यमार्गावर आंदोलन

सरवडे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील गारगोटी-कोल्हापूर राज्यमार्गावर श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुमारे तासभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी राज्य शासनावर कोरडे ओढले. आंदोलनावेळी रस्त्याच्या दुतर्फा सर्व वाहतूक तासभर ठप्प झाली होती. आंदोलनास उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुरेश चौगले, जनता दल बंडा पाटील, सेक्युलर गट यांनी पाठिंबा दिला.
....
आजऱ्यात शासनाविरोधात घोषणाबाजी
आजरा ः येथील संभाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले. यामुळे आजरा - आंबोली, आजरा - गडहिंग्लज मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आज सकाळी येथील छत्रपती संभाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रस्त्यावर ठिय्या मारत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे गडहिंग्लज मार्ग व आंबोली मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा सदस्य तानाजी देसाई, निवृत्ती कांबळे यांचे यावेळी भाषण झाले. या वेळी सुरेश पाटील, सखाराम केसरकर, गंगाराम डेळेकर, दत्ता कांबळे, प्रेमानंद खरूडे, आप्पासाहेब सरदेसाई, संजय देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
.....
पाटणे फाटा येथे रास्ता रोको
चंदगड ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच साखर कारखान्यावरील वजन काटे ऑनलाईन करावेत, या प्रमुख मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून दुपारी तीननंतर आंदोलनाची वेळ ठरवण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, गजानन राजगोळकर, विश्वनाथ पाटील, के. जी. पाटील, बी. एम. पाटील, सागर दळवी, सिद्राप्पा पाटील, पिंटू गुरव, गुंडू कंग्राळकर, संभाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
....
दुंडगेजवळ चक्काजाम आंदोलन

गडहिंग्लज : शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर लाभासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. येथील कार्यकर्त्यांनी दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे आंदोलन केले. सुमारे अर्धा तास गडहिंग्लज-संकेश्वर मार्ग अडविला. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ तत्काळ मिळावा, ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक थांबवावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडू नये आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात येथील कार्यकर्तेही सहभागी झाले. दुंडगे बस स्थानकाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दुपारी पावणेएकला आंदोलन सुरू झाले. सुमारे अर्धा तास गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. तालुकाध्यक्ष बसवराज मुत्नाळे, धनाजी पाटील, सुभाष पाटील, मलाप्पा आमाते, बाळासाहेब भोसले, काशिनाथ बंदी, फुलाजी खैरे, अशोक पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
.....
कोडोलीत काही काळ वाहतूक ठप्प

कोडोली : येथील एमएसइबी चौकात विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरण वीज कपंनी आणि कोडोली पोलिसांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे अजित पाटील, आनंदराव निकम,शिवाजी जाधव,सुमित पाटील,तानाजी पाटील विनोद देशमुख,प्रकाश बच्चे,किशोर पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
....

कागल -निढोरी राज्यमार्ग रोखला
सिद्धनेर्ली ः शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सिद्धनेर्लीपैकी नदीकिनारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या वेळी कागल निढोरी राज्यमार्ग काही काळ रोखून धरण्यात आला होता.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com