राजाराम हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम हरकती
राजाराम हरकती

राजाराम हरकती

sakal_logo
By

‘राजाराम’च्या यादीवर १९ हरकती

आज नोटीस काढणार ः जुन्याच आक्षेपांमुळे पुन्हा यादी गाजणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २२ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवर आजअखेर १९ हरकती दाखल झाल्या. हरकतीनुसार संबंधितांना उद्या (ता. २३) नोटिसा काढून सुनावणीला हजर रहाण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रारूप मतदार यादीतील जुन्या नावांवर विरोधी गटाकडून पुन्हा नव्याने हरकत घेण्यात आल्या आहेत. या हरकतीवर प्रादेशिक साखर सहसंचालक निर्णय काय देणार, यावर पुढील न्यायालयीन प्रक्रिया अवलंबून आहे. त्यातून ही प्रारूप यादीच पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.
‘राजाराम’ची १६ हजार ९४७ सभासदांची प्रारूप यादी १३ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाली आहे. याशिवाय संस्था गटातील १४३ संस्थांपैकी १३२ संस्थांचेही ठराव दाखल झाले आहे. या प्रारूप यादीवर हरकत दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. कालपर्यंत या यादीवर सात हरकती दाखल झाल्या होत्या. आज शेवटच्या दिवशी तब्बल १२ हरकती दाखल झाल्या आहेत. दोन दिवसांत या हरकतीवरील सुनावणी सुरू होईल. ९ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रारूप मतदार यादीतील नावांवर चुकीचे नाव असेल तर बदल करणे, पत्ता बदलणे, नाव बदलणे एवढ्याच हरकती दाखल करता येतात; पण दाखल झालेल्या १९ हरकतीपैकी बहुंताश हरकती या यापूर्वी अपात्र ठरवलेल्या १३९९ सभासदांना पुन्हा अपात्र ठरवावे, अशा स्वरूपाच्या आहेत. यापूर्वी हे १३९९ सभासद चौकशीत अपात्र ठरवण्यात आले होते. हा निर्णय सहकारमंत्री व उच्च न्यायालयातही कायम ठेवण्यात आला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने या अपात्र १३९९ सभासदांची फेर चौकशी करून त्याचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही छाननी कशी होणार, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.