
जुनी पेन्शन
84619
कोल्हापूर : जुनी पेन्शन मिळावी यासाठी शिक्षक व शासकीय कर्मचारी संघटनेच्यावतीने ताराबाईपार्क येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)
जुन्या पेन्शनसाठी ४ मार्चला मोर्चा
आमदार सतेज पाटील; शिक्षक, राजपत्रित अधिकाऱ्याची बैठक
कोल्हापूर, ता. २२ : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, काँग्रेस पूर्वीपासूनच आग्रही आहे. दरम्यान, येत्या अधिवेशनात महाविकास आघाडी जुन्या पेन्शनचा मुद्दा लावून धरेल. दरम्यान, शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ हे सरकारला दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४ मार्च रोजी सकाळी ११ ला गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटना, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला. ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे आज सर्व शिक्षक संघटना व राजपत्रित अधिकाऱ्यांची आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘देशात पाच राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरु करावी यासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला पाहिजे. राज्यात जुनी पेन्शन योजनाच १७ लाख कर्मचाऱ्यांचा शाश्वत आधार आहे. सत्तर वर्षात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जोरावरच भारताने प्रगती केली आहे. त्यामुळे जुनी पेन्शनसाठी लढा उभारण्याची आता योग्य वेळ आली आहे. सोमवारी (ता. २७) राज्याच्या अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी लक्षवेधी मांडली जाईल. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची जबाबदारी आपल्यावर राहिल.’’
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, ‘‘जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी नागपूरमधील अधिवेशना लक्षवेधी मांडली होती. या वेळी सरकार दिवाळखोरीत निघेल, असे उत्तर दिले. देशात महाराष्ट्र राज्य उत्पन्नात एक नंबर आहे. याच्या केवळ ४ टक्के रक्कम जूनी पेन्शनवर खर्च होणार आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबना केली आहे. त्यामुळे ४ मार्चरोजी एकत्रिपणे सरकारला ताकद दाखवूया.’’ दरम्यान शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादा लाड, खंडेराव जगदाळे, सी. एम. गायकवाड, राजाराम वरूटे, दत्ता पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, अतुल दिघे यांनी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मोर्चासाठी सर्व ताकद ऐकवटण्याचे आवाहन केले.