रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

84874

स्वच्छतादूत

परिसर स्वच्छतेसाठी ‘एकटी’चे हात; संस्थेतर्फे २५० जणांना कायमस्वरूपी रोजगार

इंट्रो
शहराच्या स्वच्छतेत खारीचा वाटा उचलणाऱ्या कचरावेचक महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, ही मागणी सातत्याने होत आहे. यातून त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत मिळेल, अशी आशा त्यांना आहे. शहरातील काही अपार्टमेंट सोसायटींनी या महिलांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे. परिसराची स्वच्छता करणाऱ्या ‘त्या’ परिसर विकास भगिनी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून गल्ली, कॉलनी, अपार्टमेंट आणि सोसायटी लख्ख राहू लागली आहे. महापालिकेने या महिलांना काम दिल्यास कोल्हापूर स्वच्छ, सुंदर होणार याची झलकच कॉलन्या देऊ लागल्या आहेत....
....................

चारच तासांत सोसायटी चकाचक
रूईकर कॉलनीतील परांजपे अपार्टमेंट... सकाळी दहाची वेळ.. जरीना बेपारी, हसिना शेख, रूपा पुजारी व राजश्री पुजारी या एकटी संस्थेच्या परिसर विकास भगिनी दाखल झाल्या. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दोन अपार्टमेंटमधील १०८ घरांतील ओला - सुका कचरा संकलित केला. प्रत्येक मजल्यावर जमा झालेला कचऱ्याचे तेथेच विलगीकरण केले. महापालिकेच्या घंटागाडीकडे हा कचरा सुपूर्द केला. घंटागाडीच्या कर्मचाऱ्यांनाही यांच्याकडून कचरा घेताना त्रास झाला नाही. यानंतर त्यांनी नाष्टा, पाणी आवरले आणि पुन्हा कामाला सुरूवात केली. जरिना पार्किंग लोटू लागल्या तर हसिना यांनी अपार्टमेंटचे मोकळ्या जागा (पॅचेस) लोटून पुसायला सुरूवात केली. दुसऱ्या अपार्टमेंटमध्येही रूपा पुजारी व राजश्री पुजारी यांनी पार्किंग, मोकळ्या जागा स्वच्छ केल्या. अवघ्या चार तासांत सोसायटीचा परिसर चकचकू लागला. सोसायटीने त्यांना हँण्डग्लोव्‍हज्‌, मास्क आणि स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य पुरविले आहे. या दोन - चार तासांसाठी त्यांना पुरेशी रक्कम पगार म्हणून मिळते. यावर त्यांचा घरखर्च भागतो. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उपलब्ध होतो. जरिना या कामासोबत आणखी एका अपार्टमेंटचे काम करतात. यातून मिळणाऱ्या मोबदल्यात घराचे बांधकाम केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोल्हापूरच्या स्वच्छतादूत
एकटी संस्थेच्या कचरावेचक महिला विविध माध्यमातून कोल्हापूर स्वच्छ करतात. काही महिला परिसर भगिनी म्हणून कॉलन्या स्वच्छ करतात. तर काही महिला कचरा विलगीकरणाचे काम करतात. प्लास्टिक श्रेडींग मशिन्सच्या माध्यमातून प्लास्टिकचे विघटन करतात. तर काही ओला कचऱ्यापासून खतनिर्मिती करतात.

जागेची मागणी...
संकलित झालेला कचरा महापालिकेच्या घंटागाडीकडे देण्यात येतो. मात्र कचरा त्या त्या परिसरातच संकलित झाल्यास तेथेच तो विलगीकरण करता येणे शक्य आहे. यासाठी महापालिकेने मोकळ्या जागा दिल्या तर झूम प्रकल्पावर कचरा मोठ्या प्रमाणात साठणार नाही. यामुळे कचरा वाहतुकीचा खर्च वाचेल, शिवाय त्या त्या परिसरात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती होईल आणि कचऱ्याचे निर्गतीकरण करणे सोपे होईल. यासाठी एकटी संस्थेकडून सतत मागणी केली जात आहे.
--------
चौकट
२५० जणींना कायमस्वरूपी रोजगार
जवळपास २५० महिलांना परिसर विकास भगिनीच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. ६५० महिलांना मात्र हंगामी काम मिळते. यातून त्यांची गुजराण होणे अशक्य आहे. या महिलांनी स्वावलंबी होण्यासोबत कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना केली आहे. या माध्यमातून त्यांची बचतही होते, शिवाय अडचणीत छोटी-मोठी रक्कम कर्जस्वरूपातही मिळते.
-----
कोट
मी पूर्वी भंगार गोळा करण्याचे काम करत होते. त्यातून रोज कमाई होईल, याची शाश्वती नव्हती. मात्र संस्था आणि सोसायटीच्या पुढाकारातून मिळालेल्या कामामुळे दैनंदिन खर्च भागविणे शक्य झाले आहे. थोडीफार बचतही होते. मात्र महापालिकेने कचरा वेचक महिलांना कचरा संकलनाचे काम दिल्यास त्यांच्या हाताला रोजगार मिळेल आणि कोल्हापूरही स्वच्छ राहील.
- जरीना बेपारी, परिसर विकास भगिनी

कोट
गेली दहा वर्षे एकटी संस्थेमार्फत कचरा वेचक महिलांसाठी काम केले जाते. त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, यासाठी सतत पाठपुरावा करते. या महिलांना दसरा - दिवाळीच्या वेळी स्वच्छता करणे, हॉटेल, रेस्टॉरंट, अपार्टमेंटमध्ये स्वच्छतेसाठी महिला पुरविणे असे काम ‘एकटी’ करते. पण हे काम हंगामी असते. या महिलांना कायमस्वरूपी रोजगार देणे महापालिकेला शक्य आहे. तसा कायदाही २०१० मध्ये अस्तित्वात आला, मात्र त्याची अंमलबजावणी अजून नाही.
- सविता कांबळे, एकटी संस्था
--------
दृष्टिक्षेपात...
परिसर विकास भगिनी ९००
कायमस्वरूपी रोजगार महिलांना मिळाला २५०
अजूनही प्रतीक्षेत महिला ६५०