
डॉ. यशवंतराव थोरात पुस्तक प्रकाशन
84854
डॉ. यशवंतराव थोरात यांच्या
पुस्तकांचे उद्या प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः ‘नाबार्ड''चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या ‘काही वाटा काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितिज'' या पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (ता. २५) होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला कार्यक्रम होईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी असतील. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अनुबंध प्रकाशन संस्थेच्या अस्मिता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
पुण्याच्या अनुबंध प्रकाशन संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ. थोरात यांनी आजवरच्या त्यांच्या वाटचालीतील विविध अनुभव, घटना-प्रसंगांची सुरेख गुंफण करत ‘सकाळ''च्या सप्तरंग पुरवणीतील सदरांसाठी लेखन केले. अशाच लेखांचा संग्रह असलेली ही पुस्तके आहेत. शालेय-महाविद्यालयीन शिक्षण, वडील लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात, ब्रह्मविद्येचे अभ्यासक व गुरू अच्युतराव पटवर्धन यांच्याबरोबरच्या काही आठवणी आणि पुढे प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांना भेटलेली विविध माणसं, जगभरातील प्रवासादरम्यानचे अनुभव त्यांनी लेखनातून मांडले आहेत.
डॉ. थोरात सांगतात, ‘‘मी सांगितलेल्या या कथा खऱ्या आहेत का? असं मला कधी कधी विचारलं जातं. माझं उत्तर आहे, ‘हो आणि नाही’. तपशील तंतोतंत खरे नसतील. पण, त्या गोष्टीमधला आशय खरा आहे. तरुण वाचकांना माझ्या लेखनात आशादायी भविष्य दिसेल. मध्यमवयीन ज्यांना मी मांडत असलेली मूल्यं आपली वाटतील. काही माझ्या पिढीतील आहेत. त्यांना माझ्या गोष्टींमधून स्मरणरंजन होईल. सामाजिक, राजकीय, शेती, अर्थव्यवस्था, धर्मनिरपेक्षता, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर केलेलं हे भाष्य वाचकांना नक्कीच आवडेल.’’