
जिल्हा बँक वातावरण
84938
जयघोष अन् निषेधाच्या घोषणाही
किरीट सोमय्या दौरा; जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय, सहनिबंधक कार्यालयास भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : एकीकडे जिल्हा बँकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दूर करा अशा, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची जिल्हा बँक बदनाम करू नका, अशा जोरदार घोषणा देत किरीट सोमय्यांसमोर जिल्हा बँकेच्या चौकशीचे समर्थन आणि विरोधही करण्यात आला. शाहूपुरी येथील जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय, सहनिबंधक कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहाभोवती पोलिसांच्या कडक बंदोबस्तात भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिली.
सोमय्या यांनी सकाळी सहनिबंधक कार्यालयाला भेट दिली. प्रभारी सहनिबंधक अरुण काकडे यांच्याशी चर्चा करून जिल्हा बँकेविषयी माहिती घेतली. याचवेळी जिल्हा बँक ठेवीदार, शेतकरी व बँक संलग्न संस्थेच्या प्रतिनिधींनी जोरदार घोषणा देत सहनिबंध कार्यालय गाठले. याठिकाणी सोमय्यांना भेटण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी त्यांना भेटण्यास मज्जाव केल्यानंतर शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या.
दरम्यान, काही वेळाने सोमय्या या शेतकऱ्यांना भेटले. यावेळी बाबासाहेब देवकर यांच्यासह इतरांनी शेतकऱ्यांची बँक बदनाम करू नका. राज्यात सर्वात जास्त आयकर भरणाऱ्या बँकेची चुकीची माहिती देऊ नका. पंधरा लाख शेतकऱ्यांची असणाऱ्या या बँकेची नाहक बदनामी थांबवावी, अशी मागणी करत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सोमय्या यांनी जिल्हा बँकेला भेट दिली. या ठिकाणी सकाळी नऊ पासूनच पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी बारानंतर ते जिल्हा बँकेत आले. त्यावेळी बँकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले. बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. ए. बी. माने, आर. जी. पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, मुश्रीफ यांच्या कारखान्यासाठी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्ज दीर्घमुदतीचे करुन घेतले आहे का? याची माहिती घेतली. तसेच इतर विषयांवरही चर्चा केली. वीस ते तीस मिनिटांनंतर सोमय्या बँकेतून बाहेर पडले. शासकीय विश्रामगृह येथे कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची कीड बाजूला करा आणि जिल्हा बँक वाचवा अशी मागणी केली. यावेळी, सोमय्या यांनी कोणत्याही परिस्थिती बँकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दूर केली जाईल. शेतकऱ्यांची बँक वाचली पाहिजे, अशी ग्वाही दिली. या वेळी, शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देत सोमय्या यांचे समर्थन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी महापौर सुनील कदम, सत्यजीत कदम उपस्थित होते.