
सरकारला जाग आणण्यासाठी महामोर्चा
सरकारला जाग आणण्यासाठी महामोर्चा
शांताराम पाटील ः आजऱ्यात गिरणी कामगारांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून पुरेसे गांभीर्य दाखवले जात नाही. कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहीजेत. सरकारला जाग आणण्यासाठी १२ मार्चला ठाणे पश्चिम येथील मुख्यमंत्री निवासस्थानावर महामोर्चा काढला जाणार असल्याचे शांताराम पाटील यांनी सांगीतले.
येथील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालयात महामोर्चाच्या तयारीसंबंधी गिरणी कामगार वारसदारांचा मेळावा झाला. या वेळी त्यांनी भूमिका मांडली. गिरणी कामगार संघटनेचे मुंबई प्रतिनिधी शिवाजी सावंत अध्यक्षस्थानी होते. श्री. पाटील म्हणाले, ‘गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहीजेत यासाठी सर्व श्रमिक संघातर्फे २००५ पासून गिरणी कामगारांचा लढा राज्यात सुरु आहे. आजपर्यंत लोकशाही मार्गाने लढे, आंदोलने करून शासन दरबारी मागण्या केल्या आहेत. अजूनही सरकाराला जाग आली नाही. सरकारला जाग आणण्यासाठी महामोर्चा काढण्यात येईल. महामोर्चाच्या तयारीसाठी गडहिंग्लज, चंदगड, कागल, भुदरगड तालुक्यात मेळावे घेण्यात येतील. मेळाव्यातून पुढील दिशा ठरवली जाईल.’ गोपाळ गावडे, कृष्णा चौगुले, लक्ष्मण कामते, नारायण भडांगे, हणमंत खामकर यांची भाषणे झाली. कृष्णा खोराटे, राणबा पाटील, निवृत्ती मिसाळ, मानाप्पा बोलके, दौलती राणे, कृष्णा नार्वेकर, शांता राणे आदी उपस्थित होते. पद्मिनी पिळणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोपाळ गावडे यांनी आभार मानले.