शिजलेले अन्न जनावरांना नकोच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिजलेले अन्न जनावरांना नकोच
शिजलेले अन्न जनावरांना नकोच

शिजलेले अन्न जनावरांना नकोच

sakal_logo
By

शिजलेले अन्न जनावरांना नकोच...

पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत ः जनावरांची पचनक्रिया बिघडवते

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ : भाकरी, चपाती व भात जनावरांना खायला घालणे चुकीचे आहे. माणूस व जनावर यांची पचनसंस्था वेगवेगळी असून, शिजलेले अन्न जनावरांची पचनक्रिया बिघडवते. प्रसंगी त्यांचा मृत्यूही होऊ शकतो, अशी माहिती पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
माणूस व जनावराच्या पचनक्रियेत जमीन-अस्मानचा फरक आहे. माणसाच्या पोटातील पाचक द्रव्य पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. गाय, म्हैस, बैलाने खाल्लेला चारा थेट त्याच्या पोटात जातो. त्या चाऱ्याचे पचन त्यांच्या पोटातील जंतू करतात. चाऱ्याऐवजी त्यांना भाकरी, चपाती, भात जादा प्रमाणात घातला तर पोटातील जंतूंची संख्या कमी होऊन पचनक्रिया बिघडते. त्याचा किडनीवर परिणाम होतो आणि अनेक अवयवांवर परिणाम होऊ लागतात. त्यातून त्यांचा मृत्यू होतो. केवळ शिळे नव्हे, तर ताजे अन्नही जनावरांना देणे योग्य नाही. एक बुट्टी ताजी भाकरी जनावराने खाल्ली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे त्यांना चाऱ्यासह अन्य पशूखाद्य खायला देणे जरूरीचे आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार तथा विभागीय संचालक प्रा. डॉ. ए. डी. जाधव म्हणाले, ‘भाकरी, चपाती व भात हे जनावरांचे खाद्य नाही. त्यामुळे जनावरांना ते खायला देऊ नये.’ पांजरपोळमधील राजू बागल म्हणाले, ‘शिजलेला कोणताही अन्नपदार्थ जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. तो त्यांना खायला घालू नये. पांजरपोळमध्ये नैवेद्य घेऊन नागरिक यायचे. त्यांना आम्ही नैवेद्याऐवजी गवत, भुसा, पेंड द्यावी, असे आवाहन केले. नागरिकांचे नैवेद्य घेऊन येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.’
-------
तज्ज्ञ पशुवैद्यकाने अनुभवलेले प्रसंग....

* शहरालगतच्या एका गावातील शेतकऱ्याकडे सहा म्हशी होत्या. घरगुती कार्यक्रमात केलेला मसाले भात शिल्लक राहिला. त्याने तो जनावरांना खायला घातला. पैकी तीन म्हशी दगावल्या अन् तिघींना तत्परतेने उपचार करून वाचवता आले.
* बैलाने शर्यत जिंकल्याचा आनंद त्याच्या मालकाला झाला. त्याने उत्साहाच्या भरात बैलाला अर्धी बादली खीर खायला दिली. बैलाचा त्याच रात्री मृत्यू झाला. एका शेळीने गहू खाल्ला. शेळीला वाचवण्यासाठी मालक तिला घेऊन दवाखान्यात आला. तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.