
केएमटी विषय
महापालिकेकडून ‘केएमटी’ला ३२ कोटी
---
तोटा भरण्यासाठी सलग २५ महिने मदत; मोठ्या ‘शस्त्रक्रिये’ची गरज
कोल्हापूर, ता. २४ ः तोटा कमी करण्यासाठी ‘केएमटी’कडून तोकडे प्रयत्न होत आहेत. पगाराबरोबर देखभाल-दुरुस्ती, निवृत्त कर्मचारी, पेन्शनधारकांची देणी हा खर्चाचा भार वाढत आहे. पार्किंगसारख्या कमी उत्पन्नाच्या ठिकाणी कुशल कर्मचारी नेमल्याने चालक-वाहकांअभावी बस बंद पडत आहेत. यातून ‘केएमटी’चा गाडा ओढण्यासाठी महापालिकेने २५ महिन्यांत ३२ कोटी ३० लाखांचे अर्थसहाय्य केले आहे. त्यानंतरही परिस्थितीत बदल होत नसल्याने ‘केएमटी’त मोठ्या ‘शस्त्रक्रिये’ची गरज आहे.
ऑक्टोबरपासून तोट्यातील मार्ग बंदबाबत शहरातील सामाजिक संघटना महापालिका, ‘केएमटी’कडे पाठपुरावा करीत आहेत. त्यातून ‘केएमटी’ने मार्गांचा तसेच फेऱ्यांचा अभ्यास केला. सध्या ६५ ते ७० बस रस्त्यावर धावत असतात. पण, देखभालही व्यवस्थित होत नसल्याने रोज पाच ते सहा बस ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण आहे. मुळात मार्गावर बसच्या फेऱ्या कमी, त्यात ब्रेकडाऊन झाले तर एकेका मार्गावर बससाठी थांबून-थांबून प्रवासी वैतागतात. त्यातून ‘केएमटी’चे प्रवासी वडापकडे वळत असल्याने उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. उत्पन्न कमी असले तरी नियमित खर्च सुरूच असून, तो भागविण्यासाठी सध्या कोणताही मार्ग नाही.
त्यासाठी २०२१-२०२२ वर्षातील १५ महिन्यांसाठी १८ कोटी २० लाख; तर २०२२-२०२३ या वर्षातील दहा महिन्यांसाठी १४ कोटी नऊ लाखाचे अर्थसहाय्य महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या दर महिन्याच्या पगारासाठी तंगी असताना इतका निधी ‘केएमटी’वर खर्च करणे विसंगत होत आहे. त्यासाठी तोट्यातील मार्ग बंद करण्याच्या विषयाला नेहमी बगल दिली जाते. त्यासाठी विविध कारणे रंगवली जात आहेत. त्यातील काही वस्तुस्थितीदर्शक असली, तरी त्यासाठीच्या पर्यायांवर निर्णय घेतले जात नाहीत. विविध मार्गावर नेहमी सर्व फेऱ्या गरजेच्या नाहीत, तेथील कमी करणे व आवश्यक ठिकाणी वाढविणे हे काम लवचिकपणे केले पाहिजे. एका मार्गावर इतक्या फेऱ्या आहेत म्हणून त्याच चालविणे ही मानसिकता तोटा वाढवत आहे. शहरांतर्गत सुरू केलेल्या शटल सर्व्हिसमधून उत्पन्न-खर्चाची तोंडमिळवणी होत असल्याचे दिसून येत असल्याचे ‘केएमटी’च्या अधिकाऱ्यांनीच सांगितले. तशा प्रकारच्या फेऱ्यांबाबत अभ्यास केला पाहिजे. तसेच, फेऱ्यांचे वेळापत्रक तातडीने बदलून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
महापालिकेकडून अर्थसहाय्य
२०२१-२०२२
१८, २०, ८९, ५३४
....
२०२२-२०२३
१४, ०९ ,८५, ४५०
.....
चार्ट करणे
२०२२ मधील प्रतिबस रोजचे सरासरी उत्पन्न
जानेवारी ः ७,७३२
फेब्रुवारी ः ८,५००
मार्च ः ९,०१२
एप्रिल ः ९,५००
मे ः ९,४९८
जून ः १०,९६६
जुलै ः ९४८
ऑगस्ट ः ९,९५३
सप्टेंबर ः १०,५०९
ऑक्टोबर ः १०,७१२
नोव्हेंबर ः १२,०२१