
लष्करातील विविध पदांच्या भरतीसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करा
सैन्यातील विविध पदांच्या
भरतीसाठी १५ मार्चपर्यंत अर्ज करा
कर्नल आकाश मिश्रा यांचे आवाहन; एप्रिलमध्ये होणार लेखी परीक्षा
कोल्हापूर, ता. २४ ः अग्निवीर भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता लष्कर भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत आहे. एप्रिलमधील तिसऱ्या आठवड्यात देशातील विविध १७६ ठिकाणी एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती सैन्य भरती अधिकारी कर्नल आकाश मिश्रा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
कर्नल मिश्रा म्हणाले, ‘लष्कर भरतीची प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय, पारदर्शक असणार आहे. भरती करून देण्याच्या नावाखाली जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर अशा आमिषांना कोणीही बळी पडू नये. भरती प्रक्रियेत काही सुधारणा केली आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षांपर्यंत आहे, असे उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. पाच विभागांसाठी ही भरती होणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होण्यासाठी परीक्षा शुल्काची आकारणी ऑनलाईन बँकिंग, युपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशा माध्यमातून स्वीकारले जाणार आहे. या भरतीची सर्व माहिती (www.joinindian) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एप्रिल महिन्यात लेखी परीक्षेतून गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.