
अंगणवाडी सेविका
85063
....
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू
आमदार प्रकाश आबिटकर ः अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, बालवाडी कर्मचारी युनियन, आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस आयटक यांच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांना देण्यात आले. दरम्यान, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्यांची माहिती दिली आहे. येत्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात घोषणा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या आश्वासनाची आठवण मी व्यक्तिशः मुख्यमंत्र्यांना करून देईन, असे आश्वासन श्री. आबिटकर यांनी शिष्टमंडळाला दिले.
अंगणवाडी सेविका मध्यवर्ती बसस्थानकावरून मोर्चाव्दारे विश्रामगृहावर आल्या. त्यांनी श्री. आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना ८ हजार ३००, तर मिनी अंगणवाडी सेविकांना ५ हजार ७०० व मदतनीसांना ४ हजार २०० मानधन देण्यात येते. या सेविकांना ‘मानसेवी’ असा दर्जा शासनाने दिला आहे. तसेच कामगार कायद्याचे कोणतेही संरक्षण या सेविकांना नाही. महागाई वाढती असूनही या सेविकांना महागाई भत्ता वाढ मिळत नाही, अशा स्थितीत सेविकांना काम करूनही पुरेसे वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालवणे मुश्कील बनले आहे. अशा स्थितीत या सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, बहुसंख्य अंगणवाडी सेविका या वर्षानुवर्षे सेवा बजावत आहेत याची दखल घेऊन त्यांना शासकीय वेतनश्रेणी, भत्ते यांचा लाभ द्यावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महिला बालविकासमंत्री यांच्यासोबत यापूर्वी अनेक वेळा झालेल्या बैठकात त्या मागण्या केल्या आहेत. तेव्हा त्यांनी सेविकांना मानधनवाढीचे आश्वासन दिले होते. मात्र त्याला काही महिने उलटले तरीही अंमलबजावणी झालेली नाही. दिल्ली, केरळ, आंध्रप्रदेश, हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेशात अंगणवाडी सेविकांना यापूर्वी मानधनवाढ देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने सेविकांना मानधन वाढ द्यावी, अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी मिळण्यास पात्र आहेत. त्याचीही अंमलबजावणी व्हावी. अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, वर्षा लव्हाटे, सुनंदा खाडे, सावित्री शिंदे, जयश्री पोवार, रेखा पाटील, जयश्री बागडे, भारती बोलाईकर, लता पाटील, भारती चव्हाण, बनाबाई वाडकर आदींनी निवेदन दिले.
....