गायींचा मृत्यू

गायींचा मृत्यू

कणेरी मठावर गायींचा मृत्यू
---
संख्या १२ हून अधिक; ‘पशुसंवर्धन’ची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : कणेरी मठावरील गोशाळेतील १२ हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी आज दिली. अन्नातील विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या गायींचा आकडा ५० हून अधिक असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दरम्यान, तीन गायींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. लोकोत्सवाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने कोणी जाणीवपूर्वक गायींना मारण्याचा प्रयत्न केला आहे का, हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे मठावरील सूत्रांनी सांगितले.
सिद्धगिरी मठावर सध्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. हजारो भाविक तेथे भेट देत आहेत. त्यांच्यासाठी अन्नछत्राची उभारणीही करण्यात आली. महोत्सव सुरू असताना काल (ता. २३) रात्री काही गायींचा मृत्यू झाला. काही अत्यवस्थ असून, त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. गायींचा अचानक मृत्यू झाल्याने त्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

अनपेक्षित अपघात
दरम्यान, लोकोत्सवादरम्यान काही गायींचा अचानक झालेला मृत्यू अनपेक्षित अपघात आहे. एकीकडे गायींचा जीवापाड सांभाळ करीत असताना अचानक काही गायींचा झालेला मृत्यू ही मनाला वेदना देणारी बाब आहे. मठातर्फे गोशाळेची स्थापना केली असून, भाकड व भटक्या गायींचे पालनपोषण केले जाते. ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच, ‘लम्पी’च्या साथीत हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचविले आहेत. भटक्या कुत्र्यांसाठी नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरू केली. गायींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचा शवविच्छेदन अहवाल लवकरच येईल. माध्यम प्रतिनिधींनी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमांत योगदान दिले आहे. आज खोडसाळपणे माध्यम प्रतिनिधीबाबत गैरप्रकार करण्यात आला. त्याबद्दल व्यवस्थापनातर्फे दिलगिरी व्यक्त करीत असल्याचा खुलासा मठातर्फे करण्यात आला आहे.

कणेरी मठावर घडलेली घटना दुर्दैवी अपघात आहे. कोणीतरी अज्ञानापोटी हे केलेले आहे. जाणीवपूर्वक कोणी करणार नाही. रस्त्यावरील गाय आणून त्यांचा सांभाळ करणारे आम्ही आहोत. त्यामुळे या गोष्टीचे सगळ्यात मोठे दु:ख आम्हाला आहे.
- अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी

डॉक्टरांचे २५ जणांचे पथक
दरम्यान, २५ पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पथक मठावर दाखल झाले आहे. पथकाने गंभीर गायींवर तत्काळ उपचार सुरू केले. काही गायी उपचारांना प्रतिसाद देत आहेत. अजूनही सहा ते सात गायींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज तातडीने मठावर भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. मृत गायींच्या उत्तरीय तपासणीचे अहवाल शनिवारी (ता. २५) येतील, असे त्यांनी सांगितले.

धक्काबुक्कीचा गुन्हा नोंद
मठावर वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधीसह कॅमेरामनला एका स्वयंसेवकाने धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना दिले.

गोशाळेत गायींच्या २२ प्रकारच्या प्रजाती
गोशाळेत २२ प्रकारच्या गायींच्या प्रजाती आहेत. पुंगनूर, वेचूर, बरगूर, निमारी, उमलाचारी, राठी, थारपरकर, कांकरेज, खिलार, काजळी, खिलार, ओंगळ, कृष्णावेल्ली, कोकणगिड्ड, हल्लीकार, लाल कंधारी, गीर, सहीवाल, जवारी, डांगी, अमृतामल, देवणी यांचा त्यात समावेश आहे. सुमारे ९०० पैकी ४०० गायी, २०० बैल, तर उर्वरित वासरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com