
पोलिस वृत्त एकत्रित
विषारी द्रव प्यायलेल्या एकाचा मृत्यू
कोल्हापूर : वाय.पी. पोवार नगर परिसरातील एकाने विषारी द्रव पिल्याने त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. आज त्याचा मृत्यू झाला. मारुती विष्णू ढोपे (वय ४२) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात विषारी द्रव पिले होते. नातेवाईकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
--------
टरपेंट ऑईल पिल्याने बालक अत्यवस्थ
सांगवडेवाडी : वसगडे (ता. करवीर) येथे टेरेसवरील बाटलीतील टरपेंट ऑईल पाणी समजून पिल्याने सहा वर्षाचे बालक अत्यवस्थ झाले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पाणी समजून टरपेंट ऑईल प्यायल्यावर उलट्या सुरू झाल्या. आई-वडिलांना हे कळताच त्यांनी गडमुडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर त्याची प्रकृती ठिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
------
ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीची निदर्शने
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल असलेल्या ए.एस. ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांची चौकशी करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप शनिवारी ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केला. याबाबत सेबीच्या संचालकांसमोर आज निदर्शने केली. तसेच गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. इन्व्हेस्टर्स असोसिएशनने सायबर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या सेमिनारसाठी सेबीचे वरिष्ठ संचालक गिरीराज प्रसाद गर्ग आणि पदाधिकारी अश्वानी भाटिया आले होते. त्यांच्यासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत गर्ग यांनी दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.