
मुश्रीफ प्रतिक्रिया
समरजित घाटगेंकडून
जनतेची दिशाभूल
आमदार हसन मुश्रीफ ः माझी विश्वासार्हता खोट्या गुन्ह्यांनी संपणार नाही
कोल्हापूर, ता. २५ ः सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना व शाहू दूध संघाबद्दल समरजित घाटगे यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी व लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी आहेत. मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याच्या इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.
दरम्यान, मी गेली ३५-४० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. गोरगरीब जनतेचे प्रेम आणि विश्वासार्हता मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे. ३५-४० वर्ष रक्त आठवून ही विश्वासार्हता मिळविलेली आहे. कुणी काहीही आरोप करून, खोटे गुन्हे दाखल करून ती जाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
याबाबत मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आम्हाला सहकारी साखर कारखानाच उभा करायचा होता. परंतु, त्यावेळी शासनाने सहकारी साखर कारखानदारीला बंदी घातली होती. शासकीय थकहमी न देण्याचाही निर्णय सरकारने घेतल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला खासगी कारखाना उभारावा लागला. ४० हजार लोकांचे पैसे आणि पाच राष्ट्रीयीकृत बँकांची कर्जे, असे पैसे उभा करून माझ्या मुलांनी हा साखर कारखाना उभा केलेला आहे. अवघ्या काही दिवसांतच ४० हजार शेतकरी ४० कोटी रुपये साखर कारखान्याच्या उभारणीसाठी देऊ शकतात, यावरून आमची विश्वासार्हता किती आहे, हे स्पष्ट होते. दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू दूध संघ काढायचा आणि समरजितना चेअरमन करावयाचे ठरविले. त्यावेळी पहिल्यांदा एक हजार रुपयांचा शेअर्स आणि त्याप्रमाणे पावत्या दिलेल्या होत्या. त्या पावत्या पुन्हा बदलून त्यांनी पाच हजारांचा शेअर्स केला. पहिल्यांदा केलेला तो शेअर्स का परत घेतला आणि त्याच्या पावत्या का बदलल्या, याचेही कारण त्यांना माहीत आहे. याच कारणामुळे आम्हालाही शाहू दूध संघाप्रमाणेच हे पैसे उभे करावे लागले. त्यामुळे, आज समरजित जे विचारत आहेत की, सभासद कुठे आहेत, जनरल बॉडी कुठे आहे, वार्षिक अहवाल कुठे आहे? या सगळ्याची उत्तरे त्यामध्ये आहेत. भागभांडवलदारांचे पैसे कुठे गेले? याची सगळी माहिती आम्ही यंत्रणांना दिलेली आहे. समोरासमोरून लढण्याची हिंमत नाही म्हणून अशा कूटनीतीने मला कुठेतरी अडकवायचे आणि अडचणीत आणायचे यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत.
.......
श्रीखंडाचा अर्धा कपही नाही
‘शाहू दूध संघाच्या शेअर्सचे पाच हजार रुपये घेतले, त्या सभासदांना आजअखेर श्रीखंडाचा अर्धा कपही दिलेला नाही. त्या सभासदांची फसवणूक तर त्यांनी केलेलीच आहे. आता हा शाहू दूध संघ त्यांनी चालवायला दिला की विकलेला आहे, हे त्या दूध संघाच्या व्हन्नूरच्या माळावरील कार्यस्थळावर जाऊनच पाहून खात्री करून घ्यावी. संघ मॅनेजमेंट कोण करतेय, कुणाच्या गाड्या आहेत, कुणाचे युनिफॉर्म घालून ते अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत ते पाहावे, असेही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.