गडहिंग्लजची ६० आरक्षणे कागदावरच

गडहिंग्लजची ६० आरक्षणे कागदावरच

गडहिंग्लजची ६० आरक्षणे कागदावरच
---
मूळ विकास आराखड्याचे चित्र; वाढीव हद्दीतील २४ आरक्षणांची आणखी भर
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : मूळ शहर विकास आराखड्यातील ६० आरक्षणे अद्याप कागदावरच आहेत. त्यात वाढीव हद्दीतील आणखी २४ आरक्षणांची भर पडली. भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार करून विकास आराखडा करायचा, नागरिकांच्या गरजेची आरक्षणे टाकायची आणि ती तशीच विकासाविना ठेवायची, असे चित्र कित्येक वर्षांपासून कायम आहे.
शहराच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यातील आरक्षणांची चर्चा सुरू असताना शहराच्या मूळ विकास आराखड्यातील आरक्षणे किती विकसित झाली, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्याचा धांडोळा घेतला असता ६६ पैकी तब्बल ६० आरक्षणे विकासाविना तशी कागदावरच राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गडहिंग्लज शहराचा पहिला विकास आराखडा १९८३ मध्ये झाला. त्या वेळची आरक्षणे अजूनही विकासाविनाच आहेत. दर दहा वर्षांनी विकास आराखडा करण्याचा नियम असताना शहराचा दुसरा विकास आराखडा २५ वर्षांनी झाला. २०१७ मध्ये या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाली.
दोन्ही विकास आराखड्यातील आरक्षणांचा विकास रामभरोसे आहे. या आरक्षणांच्या विकासासाठी कोट्यवधीचा खर्च पालिका करू शकत नाही, आणि शासन तितका निधी देत नाही अशा कोंडीत ही आरक्षणे अडकली आहेत. यात बहुउद्देशीय सभागृह, एसटीपी, पार्किंग, उद्याने, कमर्शियल कॉम्प्लेक्स, शहराचा विस्तार लक्षात घेता निश्‍चित केलेली भाजी मंडई अशी महत्त्वपूर्ण आरक्षणे कागदावरच आहेत. बहुतांश आरक्षणे खासगी जागेवर असल्याने त्याच्या भूसंपादनाचा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा आहे. आरक्षण विकसितची जबाबदारी पालिकेची असली तरी त्याच्या संपादनासाठी आवश्यक कोट्यवधीचा निधी खर्च करण्याची कुवत पालिकेची नाही. शासनही भूसंपादनासाठीचा निधी देऊ शकत नाही. आरक्षण विकसित करण्यासाठी आवश्यक निधी मिळेल; पण भूसंपादनाच्या भरपाईचे काय, या मुद्यावर ही आरक्षणे पडून राहिल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध झालेल्या वाढीव हद्दीच्या नव्या विकास आराखड्यात २४ आरक्षणांचा समावेश आहे. मुळात मूळ शहरातील ६० आणि त्यात भर पडलेली नवी २४ आरक्षणे केवळ कागदावरच राहण्याचा अधिक संभव आहे.
-------------------
* जागेच्या मालकीचा वाद...
सध्या प्रांत कार्यालय असलेली जागा कोणाची, याबाबत पालिका व महसूल खात्यात मालकीचा वाद आहे. येथे कमर्शियल शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आरक्षण असून, ते झाल्यास पालिकेला मोठे उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. मात्र, जागा मालकीच्या वादात हे महत्त्वपूर्ण आरक्षण कागदावरच असून, यात तोडगा निघणे आवश्यक आहे.
------------------------
* उत्पन्न कमी... खर्चावर ताण
गडहिंग्लज पालिकेचे दुकानगाळे, घरफाळा, पाणीपट्टी व इतर करातून साडेपाच ते सहा कोटींपर्यंतचे वार्षिक उत्पन्न मिळते. यातील बहुतांश खर्च पायाभूत सुविधांवरच होतो. इतर विकासासाठी पालिका निधीत काहीच उरत नाही. त्यात आरक्षणांच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी कोठून आणायचा, हा प्रश्‍न आहे. म्हणूनच ही आरक्षणे विकासाविना कागदावरच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com