
कागल राजकारण
लोगो-
सरकारनामा
कागलचे राजकारण पुन्हा ‘केडीसीसी’भोवतीच
---
दुसऱ्यांदा बँक लक्ष्य; मंडलिक-मुश्रीफ वादाला मिळाला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्त्व असलेले कागलचे राजकारण पुन्हा एकदा जिल्हा बँकेभोवती फिरू लागले आहे. पूर्वी अपात्र कर्जमाफी, दोन कोटी ८७ लाखांच्या अपहारावर झालेल्या आरोपानंतर आता ‘ब्रिक्स’ आणि बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याला दिलेल्या कर्जावरून बँक गाजत आहे.
दरम्यान, या नव्या वादाने १६ वर्षांपूर्वी बँकेच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या (कै.) सदाशिवराव मंडलिक विरुद्ध मुश्रीफ यांच्यातील वादाला उजाळा मिळाला आहे. बँकेत खरोखरच काही चुकीचे घडले असेल तर संबंधितांवर कारवाईच झाली पाहिजे. पण, शेतकऱ्यांच्या या बँकेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.
पूर्वी बँकेचे नेतृत्व दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक करीत होते. बँकेच्या अध्यक्षपदी (कै.) मंडलिक यांना त्यांचे व्याही माजी आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांना बसवायचे होते. पण, श्री. मुश्रीफ यांनी त्याला विरोध केला. त्यातून या दोघांतच वादाची ठिणगी पडली. यावरून (कै.) मंडलिक यांनी चुकीच्या पद्धतीने वाटप केलेल्या कर्जमाफीविरोधात तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेऊन ४३ हजार शेतकऱ्यांची ११२ कोटी रुपयांची रक्कम अपात्र ठरली. त्याच दरम्यान बँकेच्या कागल येथील दोन शाखांत दोन कोटी ८७ लाखांचा अपहार झाला. (कै.) मंडलिक यांना हे आयते कोलित मिळाले. त्यानंतर हा वाद विकोपालाच गेला. लोकसभा, विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. त्यातून दोन्ही गटाचेच नव्हे, तर जिल्हा बँकेचेही नुकसान झाले.
आता पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या कारभारावरच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बोट ठेवले आहे. सुरुवातीला हा मुद्दा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काढला. त्यानंतर जिल्हा बँकेसंदर्भात अनेक मुद्दे चर्चेत आले. नुकत्याच झालेल्या सोमय्या यांच्या दौऱ्यात समरजितसिंह घाटगे त्यांच्याबरोबर होते. जिल्हा बँक हेच आता कागलच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आहे. भविष्यात काय होईल, याची उत्सुकता आहे. पण, या वादात बँकेचे हित अबाधित राखणे महत्त्वाचे आहे.
चौकट
समरजितसिंह घाटगेंचे प्रबळ आव्हान
श्री. मुश्रीफ या मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झाले. त्यातील १५ वर्षांहून अधिक काळ ते मंत्री राहिले आहेत. सर्वाधिक वेळा त्यांची लढत संजय घाटगे यांच्याबरोबरच झाली. आता हेच संजय घाटगे श्री. मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत. पण, दुसरीकडे समरजितसिंह यांनी मात्र मतदारसंघात रान उठवून श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात प्रबळ विरोधक कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले. गेल्या निवडणुकीत त्यांना अपक्ष असताना पडलेली ८८ हजार मतेही दुर्लक्षित करून चालणार नाहीत. आता ते भाजपचे उमेदवार असतील. खासदार प्रा. संजय मंडलिक हे सध्या भाजपबरोबर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समरजितसिंह यांच्या रूपाने मुश्रीफ यांच्यासमोर प्रबळ आव्हान असेल.
चौकट
बँकेची भरारी
काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या वादात ‘दत्त-आसुर्ले’ कारखाना अवसायनात काढल्याने बँक अडचणीत आली. त्यानंतर २००९ मध्ये बँकेवर प्रशासक नियुक्तीची कारवाई झाली. याच दरम्यान राज्यातील दहा जिल्हा बँका अडचणीत आल्या होत्या. या दहाही बँकांना शासनाने आर्थिक मदत केली. पण, अजूनही यातील सात बँकांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. याउलट प्रशासकांच्या काळात कोल्हापूर जिल्हा बँकेने चांगली प्रगती केली. सहा वर्षांनंतर बँकेत संचालक राज आल्यावर बँकेचा चढता आलेख कायम राहिला. बँकेने २००९ ते २०२३ या काळात घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. तथापि, अलीकडे होत असलेल्या आरोपांमुळे बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.