
विशालगड संवर्धन समितीचे आवाहन
‘ओवैसींनी विशाळगडावरील
प्रकारांची माहिती घ्यावी’
कोल्हापूर : ‘मजलिस इत्तेहादूल मुसलेमीन’चे (एमआयएम) खासदार असदुद्दीन ओवैसी तुमची आम्ही वाट पाहत आहोत. विशाळगडावर सुरू असलेल्या काळाबाजाराची माहिती घ्या आणि आम्हाला भेटल्याखेरीज जाऊ नका’, असे आवाहन विशाळगड संवर्धन समितीचे हर्षल सुर्वे यांनी केले आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे. गडावरील अतिक्रमण काढा, अशी इतिहासप्रेमींची मागणी आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले टाकली आहेत. महाशिवरात्रीवेळी गडावर आतषबाजी झाली. ती दर्गाहच्या दिशेने झाल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर श्री. सुर्वे यांनी म्हटले आहे की, ‘तुम्ही गडावर येणार असल्याचे कळाले आहे. महाशिवरात्रीला झालेल्या केवळ आतषबाजीची तुम्ही माहिती घेऊ नका. दर्गाच्या परिसरात थाटलेल्या दुकानांची माहिती घ्या. येथील दुकानांतून मद्य, गांजाची विक्री होते, तेही जाणून घ्या. इथल्या काळाबाजाराची माहिती घ्या. हा छत्रपती शिवरायांचा गड आहे. आम्ही तुमची वाट पाहत आहोत. जेव्हा याल तेव्हा जरूर भेटा. आमची भेट घेतल्याखेरीज जाऊ नका.’