सुमंगल महोत्सव सांगता समारंभ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमंगल महोत्सव सांगता समारंभ बातमी
सुमंगल महोत्सव सांगता समारंभ बातमी

सुमंगल महोत्सव सांगता समारंभ बातमी

sakal_logo
By

85483
...

जीवनशैली बदलानेच पर्यावरण संवर्धन शक्य

रा. स्व. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २६ : ‘आपण ‘कमोडिटी कल्चर’ मध्ये जगत आहोत. त्यामुळे आपले जीवन भोगवादी बनले आहे. उपभोगासाठी आपण सृष्टीचा संहार करत आहोत. आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरण संवर्धन होऊ शकेल’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. सिद्धगिरी मठावरील सुमंगलम्‌ लोकोत्सवाच्या सांगता समारंभात आज ते बोलत होते.
अध्यक्षीय भाषणात होसबळे म्हणाले, ‘‘आपले शरीर पंचतत्त्‍वांपासून बनले आहे. माणसाने तपश्चर्या करून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लावला. त्यावेळी या पंचमहाभुताच्या अस्तित्वाची जाणीव झाली. भूमी, वायू, जल, अग्नि व आकाश ही पाच तत्त्‍वे असून त्यापासूनच सृष्टीची निर्मिती झाली आहे. मानवाच्या उपभोग जीवनशैलीमुळे या पंचत्त्‍वांचा संहार सुरू आहे. पाश्चिमात्य जगात पर्यावरणाचा ऱ्हास गतीने सुरू आहे. तरी ते आपल्याला प्रदूषण नियंत्रणासंदर्भात सूचना करतात. त्यांच्या कमोडिटी कल्चरमुळेच पर्यावरण धोक्यात आले आहे. आपणही त्याच वाटेने चाललो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये सृष्टीतील सूक्ष्म घटकाचा देखील विचार केला आहे. हा विचार आत्मसात करून आपण आपली जीवनशैली बदलली तरच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. याच दृष्टिकोनातून सुमंगलम्‌ लोकोत्सवाची मांडणी केली गेली आहे. यातील प्रत्येक प्रयोगाचा विचार करून आपापल्या ठिकाणी अंमलबजावणी केल्यास आपण पर्यावरणासंदर्भात निश्चित काहीतरी मोठे करू शकतो.''
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘काडसिद्धेश्वर स्वामी नेहमीच माणसाच्या मूलभूत गोष्टींवरती काम करतात. गाय, शेती, आरोग्य यामध्ये त्यांनी मोठे कार्य केले आहे. सुमंगलम्‌ लोकोत्सवातील विचार घरोघरी नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे.’’

काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, ‘‘पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करा. सेंद्रिय शेतीचा अवलंब करा. घन कचरा, खरकटे अन्न यापासून खते बनवा.
तसेच ‘एक विद्यार्थी -एक झाड’, ‘एक शाळा एक वन’ उपक्रम राबवा. आयुर्वेदिक उपचारांवर भर द्या. शाळांनी रोपवाटिका सुरू करावी. त्याचबरोबर ऊर्जेचा वापर मर्यादित करून श्रमशक्तीचा वापर वाढवा.
सांगता समारंभाला कर्नाटकचे सभापती बसवराज होराटी, गोव्याचे सभापती रमेश नवडकर, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार महेश शिंदे यांच्यासह संत- महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.