
घरफोडी करणाऱ्याला अटक
जामिनावरील चोरट्याने पुन्हा मारला डल्ला
पोलिसांनी केले अटकः १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः कळंबा कारागृहात दीड वर्षांची शिक्षा भोगणारा संतोष नारायण जाधव (वय ३४, रा. वेताळ पेठ, इचलकरंजी) याने जामिनावर बाहेर आल्याच्या तिसऱ्याच दिवशी पुन्हा चोरी केली. पोलिसांनी चोरीचा छडा लावून संतोषला अटक केली. त्याच्याकडून दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव हा सराईत चोरटा असून, तो वयाच्या १७ व्या वर्षापासून चोरी करतो. त्याने राजारामपुरीमधील एका मंगल कार्यालयात चोरी केली होती. त्या प्रकरणी त्याला शिक्षा झाली. तब्बल २२ महिने कळंबा मध्यवर्ती कारागृहात घालवल्यावर त्याला २१ फेब्रुवारीला जामीन मिळाला. त्यानंतर त्याने गुरुवारी (ता.२३) मंगळवार पेठेतील एका नर्सिंग होममध्ये पर्स आणि मोबाईची चोरी केली. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही आणि संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासून संतोषला अटक केली. चोरीतील दोन मंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले, रोख रक्कम आणि मोबाइल असा १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, प्रीतम मिठारी, अमर पाटील आदींनी ही कारवाई केली.