
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
जागृती केंद्रावर दहावी परीक्षेचे नियोजन
गडहिंग्लज : दहावीची बोर्ड परीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहेत. जागृती केंद्रातंर्गत या परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून या केंद्रावर एफ-०९३५४९ ते एफ-०९४१३५ या क्रमांकापर्यंतची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र संचालक डी. व्ही. चव्हाण यांनी दिली. सर्व परीक्षार्थींनी सकाळच्या सत्रातील पेपरसाठी सकाळी साडेदहा तर दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा हॉलमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब होणार नाही याची दक्षता विद्यार्थी, पालकांनी घ्यावी. ही परीक्षा कॉपीमुक्त आहे. याची दक्षता घेवून पालक व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
---------------------
‘ओंकार’च्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
गडहिंग्लज : कणेरीमठावर झालेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात येथील ओंकार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिली. महोत्सवातील विविध प्राणी, वस्तू, प्रदर्शन व बौद्धिक व्याख्यानाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. पर्यावरण, अर्थशास्त्र व कनिष्ठ विभाग, सांस्कृतिक विभागातर्फे आयोजिण्यात आला होता. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे प्रोत्साहन तर कविता पोळ, डॉ. काशिनाथ तनंगे, डॉ. शर्मिला घाटगे, डॉ. संजीवनी पाटील, क्रांती शिवणे, शीतल डवरी यांचे मार्गदर्शन मिळाले.