
गडहिंग्लजचा ‘श्वास’ कोंडतोय
GAD277.JPG
85617
गडहिंग्लज : वाहतूक कोंडीमुळे शहरातील विविध गल्ल्या गुदमरत असून बुरुड गल्लीतील अशा पार्किंगमुळे रहिवाशांचा श्वास कोंडत आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------------------------------------------
गडहिंग्लजचा ‘श्वास’ कोंडतोय
गल्यांमध्ये बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी; स्वत:चे वाहन लावणे, घरात जाणेही मुश्कील
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : दुचाकी आणि चारचाकी पार्किंगमुळे शहरातील बाजारपेठ लगतच्या गल्ल्या गुदमरत आहेत. वाहतूक कोंडीने त्यांचा श्वास कोंडत आहे. गल्ल्यांमध्ये वाहनांचे पार्किंग इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की तेथील रहिवाशांना स्वत:चे वाहन लावण्यासह घरात जाणेही मुश्कील बनत आहे. वाहतूक कोंडीचे हे लोण शहरभर गंभीर स्वरुप धारण करीत आहे.
अलीकडील काही वर्षापासून शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. वाहनांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की वाहने लावण्यास जागा देता जागा...असे म्हणण्याची वेळ आली आहे. खरेदीसाठी संबंधित दुकानाच्या उंबऱ्यालाच वाहन जावे, अशी मानसिकता वाहनधारकांची असल्याने वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. सुरुवातीला मेन रोड आणि मुख्य बाजारपेठेत असणारी वाहनांची गर्दी आता बाजारपेठ लगतच्या गल्ल्यांमध्ये विस्तारली आहे. अशी एकही गल्ली शिल्लक नाही की तेथे सलग पार्किंग झालेले नाही. दोन्ही बाजूने पार्किंगमुळे चारचाकी वाहन जाणे अडचणीचे ठरत आहे. स्थानिक रहिवाशांच्या गेटसमोरही पार्किंग होत असल्याने त्यांना आपले वाहन बाहेर काढणे शक्य होत नाही. यामुळे संबंधित वाहनधारक व रहिवाशांत वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
व्यापाऱ्यांनाही या पार्किंगचा त्रास होत आहे. आपापल्या दुकानासमोर ‘नो पार्किंग’ चे फलक लावले असले तरीही फलकासमोरच वाहन लावण्याचे प्रकार होत असल्याने वादामध्ये भर पडत आहे. आलेल्या गिऱ्हाईकाचेही वाहन लावण्यास संबंधित दुकानांसमोर जागा नसते. त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याची ओरड सुरू झाली आहे. लक्ष्मी रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. गाडीवर बसूनच भाजी खरेदी केली जात असल्याच्या प्रकारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच नाही. यामुळे बेशिस्त पार्किंग व वाहतूक फोफावत चालली आहे.
-------------------
या भागाचा श्वास कोंडतोय
बुरुड गल्ली, पिराजी पेठ, वीरशैव बँकसमोरील गल्ली, स्टेट बँकशेजारची गल्ली, मंत्री बिल्डिंगकडे जाणारा मार्ग, टिळक पथक, राणी लक्ष्मीबाई रोड, भगतसिंग रोड, खणगावे-कित्तूरकर गल्ली, काळभैरी रोड, बागी कॉम्प्लेक्स गल्ली, साधना बुक स्टॉल ते शिवाजी बँक, लक्ष्मी रोड आदी भागांचा पार्किंगमुळे श्वास कोंडत आहे.
----------------------------
उद्रेकापूर्वी नियोजन हवे
गल्ल्यांमधील बेशिस्त वाहन पार्किंगमुळे कधीही उद्रेक होईल अशी परिस्थिती आहे. तत्पूर्वीच नियोजन आवश्यक आहे. मुळात पार्किंगसाठी एकही सार्वजनिक जागा नाही. पालिकाही जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात दिसत नाही. मेन रोडवरील वाहतूक नियंत्रणासाठीच पोलिस उभे असतात. श्वास गुदमणाऱ्या गल्ल्यांमध्ये होणाऱ्या पार्किंगचे मात्र कोणाला देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे.