
वारसा हक्काचा प्रश्न मार्गी
वारसा हक्काचा प्रश्न मार्गी
शासन आदेशाने सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा; आमदार आवाडे यांचा पाठपुरावा
इचलकरंजी, ता. २७ ः महापालिकेतील सफाई कामगारांचा प्रदीर्घ काळापासून रखडलेला वारसा हक्काचा प्रश्न अखेर संपुष्टात आला आहे. या सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्वच सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भातील अध्यादेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच जारी केला आहे. या निर्णयाचा राज्यभरातील सफाई कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषद तथा आताच्या महापालिकेत कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरीत स्थान मिळत नव्हते. या संदर्भात प्रदीर्घ काळापासून राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. वारसा हक्काने नोकरी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न शासन दरबारी मांडून तो तातडीने मार्गी लावावा यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार आवाडे यांची इचलकरंजीत भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या. आमदार आवाडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू, अशी ग्वाही दिली होती.
--------
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी दोनच दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार वारसा हक्क संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयाबद्दल आमदार आवाडे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिष्टमंडळात श्रीरंग खवरे, रवि जावळे, अशोक लाखे, राजू माळी व आदित्य नलवडे यांचा समावेश होता.