
गडहिंग्लजला शिवसंवाद यात्रा यशस्वीतेचा निर्धार
गडहिंग्लजला शिवसंवाद
यात्रा यशस्वीतेचा निर्धार
शिवसेना ठाकरेगटाची बैठक; संजय राऊत, चतुर्वेदींचा उद्या दौरा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : जिंकण्यासाठी लढायचं यासाठी येथे बुधवारी (ता. १) सूर्या हॉलमध्ये होणाऱ्या शिवसंवाद कार्यक्रमासाठी ठाकरे खासदार संजय राऊत, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह आमदार व पदाधिकाऱ्यांचा दौरा आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना ठाकरेगटाचे नेते रियाज शमनजी, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
शमनजी म्हणाले, ‘‘सत्ता व पैशाच्या लालसेपोटी काही आमदार शिवसेना सोडून गेले व भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्तेचा गैरवापर करून पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेतले. आता पुन्हा नव्याने पक्षसंघटना उभारणीचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी लढायचं म्हणून शिवसंवाद यात्रा आयोजित केले आहे. त्यासाठी राऊत, चतुर्वेदी यांच्यासह आमदार बाबूराव माने, प्रवक्ते लक्ष्मण हाके, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत गडहिंग्लजला शिवसंवाद यात्रा होणार आहे. त्यासाठी बाळासाहेब, उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारी जनता, शिवसैनिकांनी हजेरी लावून हा दौरा यशस्वी करावा.’’
चिकोडे म्हणाले, ‘‘शिवसेना नाव व चिन्ह दोन्हीही गेले असले तरी ज्या-ज्या वेळी शिवसेनेवर आघात होतो तेंव्हा शिवसेना पुन्हा ताकदीने मैदानात उतरते. यामुळे जिंकणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही असा आदेश उद्धव ठाकरेंचा आहे. म्हणून ही यात्रा होत आहे.’’ दिलीप माने यांनी या शिवसंवादसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, कागल विभागातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले. निकृष्ट राजकारणाला छेद देण्यासाठीच शिवसंवाद यात्रा सुरू असल्याचे ते म्हणाले. या वेळी युवा सेनेचे प्रतीक क्षीरसागर, संदीप कुराडे, सुलोचना रेडेकर आदी उपस्थित होते.