अंबाबाई मंदिर मुर्ती संवर्धन

अंबाबाई मंदिर मुर्ती संवर्धन

85693
...

अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाची मागणी

मूर्तीची विविध ठिकाणी झीज : मूळ मूर्ती बदलण्याबाबतही चर्चा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून, तिच्या संवर्धनासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची मागणी भाविकांतून होऊ लागली आहे. त्याचवेळी मूर्ती बदलण्याबाबतची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या मूर्तीची विविध ठिकाणी झीज झाली आहे. यापूर्वी एक वेळा वज्रलेप तर एक वेळा रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. साधारणपणे १९२० साली मूर्तीचा डावा हात भग्न झाला. तो धातूच्या पट्ट्या जोडून अडकवण्यात आला होता. १९५५ साली पुरी पीठ शंकराचार्य योगेश्वरानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने वज्रलेप करण्यात आला; पण तोही वज्रलेप लवकरच निघून पडला. त्यानंतर मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी १९९७ साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व सर्व जबाबदार घटकांच्या संमतीने मूळ मूर्तीवरील स्नान अभिषेक थांबवण्यात आले. ते आजही बंदच आहेत. २००० साली पुन्हा वज्रलेप करण्यासाठी शासकीय समिती स्थापन झाली. मात्र, हा विषय न्यायालयात गेला आणि पुढे पुरातत्त्व खात्याच्या सूचनेनुसार काम करावे असे ठरले. २२ जुलै २०१५ रोजी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. मात्र, त्यानंतर २०१७ मध्ये मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्यामुळे दर ठराविक काळानंतर मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पुन्हा करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच संवर्धनाची प्रक्रिया झाली. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेचा विषय चर्चेत आला आहे.
...

‘रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया केल्यानंतरही मूर्तीची झीज थांबलेली नाही. मूर्ती बदलणे हाच एक उपाय असून मूर्तीची खरी परिस्थिती समजली तर तशी लोकभावना नक्कीच निर्माण होईल, यात शंका नाही.

- प्रसन्न मालेकर, मूर्ती व मंदिरे अभ्यासक
...

‘पुरातत्त्व खात्याने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन श्रीपूजक करतात. रासायनिक संवर्धनाच्या प्रक्रियेतून ती सुस्थितीत ठेवता येणे शक्य आहे. अनादि काळापासूनची ही मूर्ती असून ती बदलण्याची गरज नाही.

- माधव मुनिश्वर, श्रीपूजक मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com