गायी मृत्यू अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायी मृत्यू अहवाल
गायी मृत्यू अहवाल

गायी मृत्यू अहवाल

sakal_logo
By

पोटात आम्लता निर्माण झाल्याने गायींचा मृत्यू

पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ : कणेरी मठावरील गोशाळेतील गायींच्या पोटात भाकरी व चपाती खाल्ल्याने आम्लता निर्माण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन गायींचा शवविच्छेदनाचा अहवाल रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडून जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाला आज दुपारी मिळाला. त्यात जठरास, खाद्यांश यांचा सामू (पीएच) ३ ते ३.५ पर्यंत असल्याचे म्हटले आहे.
मठावर सुमंगलम्‌ पंचमहाभूत महोत्सव सुरू असताना गोशाळेतील बारा गायींचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर पन्नासहून अधिक आकडा सांगण्यात आला. त्यात माध्यम प्रतिनिधीच्या अंगावर तेथील स्वयंसेवक धावून गेला. त्याने प्रतिनिधीवर हल्ला केल्याने कणेरी मठ टीकेच्या केंद्रस्थानी आले. या स्थितीत गायींना भाकरी व चपाती खायला दिल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. त्यामुळे मठाने तातडीने सहा वर्षांच्या दोन गायींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. प्रथमदर्शनी त्यांच्या पोटात भाकरी व चपातीचे तुकडे आढळले. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालाकडे लक्ष लागले होते. तो आज दुपारी पशुसंवर्धन विभागाला मिळाला.
याबाबत पशुसवंर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण म्हणाले, ‘‘प्रथमदर्शनी भाकरी व चपातीचे तुकडे गायीच्या पोटात आढळले होते. शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर गायींच्या पोटातील सामूचे प्रमाण ३ ते ३.५ इतके होते, हे स्पष्ट झाले. मठावर आलेल्या काही भक्तांनी गायींना भाकरी व चपाती खायला टाकल्या असाव्यात. जर असे अन्न खायला दिले तर गायीच्या रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ॲसिडिटी निर्माण होते. त्यातून पोटात आम्लता निर्माण होऊन रक्त घट्ट होते. त्याचा हृदयावर परिणाम होऊन त्याची गती मंदावते आणि जनावर दगावते.’’