
जबरी चोरी करणारे दोन चोरटे अटक
85717
...
मोपेड घेऊन पळालेल्या
दोघांना तासाभरात अटक
९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
कोल्हापूर, ता. २७ ः दोघा तरुणांना जबरदस्तीने अडवून मारहाण करून त्यांच्याकडील मोपेड काढून घेऊन पळालेल्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी तासाभरात अटक केली. टाकाळा चौकात रविवारी रात्री ही घटना घडली होती. यामध्ये पोलिसांनी प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय १९, रा. टेंबलाईवाडी नाका, रेल्वे फाटक झोपडपट्टी) आणि आदित्य भीमराव दिंडे (वय २०, रा. दत्त गल्ली, शाहूनगर) यांना अटक केली. जबरी चोरीतील मोपेडसह चोरट्यांची दुचाकी असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, टाकाळा चौकात दोघांना अडवून जबरदस्तीने मोपेड हिसकावून घेतल्याची फिर्याद विक्रमनगरातील जहीर जमीर मुजावर याने दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. जमीर मुजावर रात्री साडेदहाच्या सुमारास मित्राला सोबत घेऊन त्याच्या मोपेडवरून फिरत होता. यावेळी टाकाळा चौकात पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गाडी आडवी मारून त्यांना थांबवले. यावेळी लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करीत जमीरची मोपेड काढून घेऊन बेपत्ता झाले. याची फिर्याद पोलिस ठाण्यात मिळताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. यासाठी कॉन्स्टेबल अमर आडूळकर, नितीन मेश्राम, विशाल शिरगावकर, रविकुमार आंबेकर, महेश कुंभार आदींनी प्रयत्न केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे करीत आहेत.
------
पोलिस आणि सीसीटीव्हीची कामगिरी
फिर्यादीने पोलिस ठाण्यात दाखल होऊन घटनेची माहिती देताच पोलिस सतर्क झाले. त्यांनी तातडीने संशयितांचा पत्ता विचारला आणि अधिक माहिती घेत असतानाच सीसीटीव्हीतून चोरट्यांचा मार्ग पाहिला. त्यामुळे त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.
--------------